अनारोग्याचे नवे आव्हान

0

महाराष्ट्रवासीयांचे आयुर्मान दहा वर्षांनी वाढल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय आरोग्य अहवालाने काढला आहे. इतकेच नव्हे तर मुदतपूर्व प्रसूतीचे प्रमाण चार टक्क्यांनी घसरले आहे.

डायरियासारखा प्रसंगी जीवघेणा ठरू शकणारा आजार आता आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. हे निष्कर्ष दिलासादायक आहेत.

असंसर्गजन्य आजारांतील वाढ, पहिला क्रमांक गाठलेला हृदयरोग व फुफ्फुसाशी संबंधित आजारांनी मारलेली उडी या निष्कर्षांचा विचार गांभीर्याने करावा लागेल.

सार्वजनिक आरोग्य राखणे हे शासनाचे कर्तव्य असले तरी वैयक्तिक आरोग्य राखणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे हे विसरून कसे चालेल?

आरोग्याच्या काही क्षेत्रात झालेली सुधारणा टिकवून ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेसह जनतेलाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक सुखसोयी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जीवनमान सकृतदर्शनी सुधारले आहे. आरोग्य सुधारत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

हे खरे असले तरी यामुळे बैठी जीवनशैली विकसित झाली आहे. त्यातून रोगराईच्या नव्या-नव्या प्रकारांचा प्रादुर्भाव होत आहे. कारण समाजाचे मन:स्वास्थ्य हरवत आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी याकडे लक्ष वेधले आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत पहिला निकाल समाजाच्या बाजूने लागला तरी समाज आजही तंत्रमंत्र, नवससायास व मांत्रिकांचे उपचार यातून बाहेर का पडू इच्छित नसावा?

सर्पदंश, ताप येणे वा अपस्माराचे झटके अशा अनेक व्याधींवर उपचारांसाठी धार्मिक स्थळे गाठण्याच्या घटना आजही का घडतात? शासकीय आरोग्य यंत्रणेचे आरोग्य बिघडून तुलनेने खालावत आहे.

आरोग्य यंत्रणेतील शासकीय सेवकांच्या काही समस्या असतील; पण या सेवेविषयी जनतेचा अनुभव पुरेसा सकारात्मक व सहानुभूतीपूर्ण का नसावा? महाराष्ट्रात 34 टक्के बालके कुपोषित आहेत.

कुपोषणामुळे बुद्धीची आकलनशक्ती व परिणामी मेंदूचा विकास खुंटतो. भविष्यात भारताला व महाराष्ट्राला कुपोषणाचा धोका जास्त प्रमाणात भेडसावण्याची शक्यता आहे, अशी चिंता डॉ. बंग यांनी व्यक्त केली आहे.

शिवाय संगणक व स्मार्टफोनसारख्या आधुनिक साधनांच्या बेसुमार वापराचे काही दुष्परिणामसुद्धा नवी दुखणी ठरू शकतील. या सर्वांचा एकत्रित विपरित परिणाम समाजाच्या आरोग्यावर होणार की नाही याचा अभ्यास जाणत्यांनी करावयाची गरज आहे.

यावर नुसते चिंतन-मंथन पुरेसे ठरणार नाही. प्रभावी उपाययोजनासुद्धा सुचवल्या गेल्या पाहिजेत. त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी व व्यापक अनारोग्याचा सामना करण्यासाठी जनजागृती मोहिमा सतत चालू ठेवाव्या लागतील.

LEAVE A REPLY

*