भलेपणाचे भाग्य नासले !

0

वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवरती, माणसास ना आधार…

गदिमांच्या गीतातील हे शब्द आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडतात. माणूसपणाला आव्हान देणार्‍या घटनांच्या भयसावल्या दिवसेंदिवस अधिक गडद होत आहेत.

माणूस माणसाविषयी अधिकाधिक असंवेदनशील होत चालल्याने संवेदनशील व्यक्तींची मती कुंठीत होऊ लागली आहे. कोणत्याही क्षुल्लक कारणांसाठी माणूस माणसाच्या जीवावर उठत आहे.

जमीनजुमल्यापुढे रक्ताच्या नात्यांचा रंग फिका पडत आहे. भाऊबंदकीच्या वादातून चुलतभावाच्या कुटुंबाला चिरडून ठार मारण्याची घटना मालेगाव-मनमाड रस्त्यावरील दहेगाव शिवारात घडली.

‘आईसारखे दैवत जगात दुसरे नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…’ अशा शब्दांत आईची थोरवी सांगितली जाते. मुलांसाठी आई हा ऊर्जेचा व निरपेक्ष प्रेमाचा मोठा ऊर्जास्त्रोत असतो, असे आपली संस्कृती शिकवते;

पण जेवण देण्यास उशीर केला या कारणावरून उत्तर प्रदेशातील बांदा शहरातील 19 वर्षांच्या युवकाने आईचीच हत्या केली. आई-वडिलांची काळजी घेण्याऐवजी त्यांना रस्त्यावर सोडून देणार्‍या दिवट्या चिरंजीवांची संख्या वाढत आहे.

तरीही वंशाच्या ‘दिव्या’चा अट्टाहास कमी होत नाही. मुलाच्या हट्टापायी एका आईने तीन महिन्यांच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह वॉशिंग मशीनमध्ये लपवला. आईच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना गाझियाबादमध्ये घडली आहे.

तिसरी मुलगीच झाल्याने तीन महिन्यांच्या नातीचा जीव घेताना जिवती तालुक्यातील आजीचा जीव क्षणभरही कचरला नाही. माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना वाढतच आहेत.

सत्तेची पकड कायम राहण्यासाठी समाजाचे लक्ष नको त्या गोष्टींकडे वेधण्याचे राजकारण्यांचे उद्योग जोरात सुरू आहेत. भारतीय जनता भावनाप्रधान आहे.

त्या भावनाप्रधानेला आपल्या वाणीप्रभावाने खतपाणी घालत व भडकावू भाषणे ठोकत त्याचा फायदा उपटण्यात सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील नेते आघाडीवर आहेत.

कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थनीय नसलेल्या गोष्टींना स्वार्थासाठी बढावा दिला जात आहे. त्यातूनच माणूस बेताल होण्याची समस्या उद्भवत आहे हे राजकारण्यांनाही नाकारता येणार नाही.

वाढत्या सामाजिक दुर्वर्तनामुळे देशाची जागतिक स्तरावरची प्रतिमा काळवंडू शकते. माणसाचा माणुसकीवरचा विश्वास गमावणे अंतिमत: समाजाच्या हिताचे नाही हे सर्व कार्यक्षेत्रातील समाजधुरीण लक्षात घेतील का ?

LEAVE A REPLY

*