हे घडले भाजपमुळे !

0
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल.
काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे ते नेहरू-गांधी घराण्यातील सहावे नेते आहेत. राहुल पक्षाचे अध्यक्ष होणार होतेच; पण ते अपेक्षेपेक्षा लवकर होत आहेत याचे श्रेय बर्‍याच अंशी भाजपकडे जाईल.

गेल्या निवडणुकीतील अनपेक्षित यशाने भाजपतील तोंडाळ कार्यकर्त्यांचे हात आकाशाला लागले. त्यांना जळी-स्थळी-काष्टी राहुल हे एकमेव शत्रू भासू लागले. वास्तविक काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत.

तथापि निवडणुकीत पराजय वाट्याला आलेल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यास तरुण रक्ताची गरज आहे हे त्या पक्षातील वरिष्ठांनाही जाणवले असावे.

तरी यंंदाच हा बदल होण्याइतकी तातडी पक्षाला कदाचित भासली नसती; पण भाजपला झालेला ‘राहुल फोबिया’चा फायदा राहुलजींना निश्चितच मिळाला असावा.

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या बहुतेक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन:पुन्हा पराभवाची चव चाखावी लागली.

पक्ष या नात्याने ती जबाबदारी सर्व काँग्रेसजनांची होती; पण त्याचे श्रेय राहुलना देण्यात सत्तारूढ विरोधकांनी धन्यता मानली. परिणामी तरुण नेतृत्वाची गरज काँग्रेसला अधिकच जाणवू लागली.

राहुल यांच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चिरफाड नको तितक्या उत्साहाने करून काँग्रेसमधील घराणेशाहीच्या नावे बोटे मोडली जात होती; पण राहुल यांनी गुजरात निवडणुकीचे आव्हान धडाडीने स्वीकारले.

गेल्या महिना-दोन महिन्यात गुजरात निवडणूक निकालाबाबत सत्तारूढ पक्षाच्या वर्तुळात भीती निर्माण करण्यात राहुल यशस्वी झाले आहेत.

शिवराळपणाची स्पर्धा न करता नेत्याने कसे बोलावे याचा वेगळा नमुना गुजराती जनता व सद्यस्थितीत बेताल बडबडीवर भर देणार्‍या सर्वच राजकीय कार्यकर्त्यांपुढे त्यांनी ठेवला आहे.

सुरुवातीला यश हमखास गृहीत धरणार्‍या भाजप नेत्यांना गुजरात निवडणूक राहुलमुळेच बरीच जड जाणार असल्याची जाणीव झाली आहे. ही सर्व स्थिती काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुलजींचे पारडे जड करणारी ठरली आहे.

म्हणूनच त्यांच्या अध्यक्षपदाचे श्रेय भाजपला नाकारता येणार नाही. ते देण्याचा मोठेपणा काँग्रेसवाले दाखवतील की नाही वा भाजपवाले स्वीकारतील की नाही हा प्रश्न अलाहिदा !

लोकशाहीत विरोधी पक्षाचे प्रमुखपद हीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी असते. ती राहुलजींनी समर्थपणे पार पाडावी अशीच देशवासीयांची इच्छा असेल.

LEAVE A REPLY

*