शेतीतील आश्वासक प्रयोग

0

ताणतणावाची अनेक कारणे असतात. तणाव कशामुळे निर्माण झाला आहे हे कळल्याशिवाय तणावमुक्त होता येत नाही. तणावाची कारणे आणि त्यावरची उत्तरे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात.

ज्याचे उत्तर मिळत नाही, असा प्रश्नच अस्तित्वात नसतो. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच. गरज असते ते उत्तर शोधण्याची, असे व्यवस्थापनाचे तंत्र म्हणते.

काही तरुण शेतकरी तणाव निराकरणाच्या या व्यवस्थापकीय सूत्राच्या आधारे प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न नेहमीच गंभीर होते. निसर्गाच्या प्रकोपाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ पडत आहे.

शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव, सरकारकडून जाहीर केला जाणारा; पण कधीच न दिला जाणारा हमीभाव, अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक समस्यांमुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

शासनाच्या पोकळ आश्वासनांनी त्यांचे गांभीर्य वाढतच गेले आहे. ग्रामीण भागाला सतत वाढत्या भारनियमनाला तोंड द्यावे लागते. दिवसाचे कित्येक तास वीज गायब असते.

याचा विपरीत परिणाम शेतीवर होतो. आवश्यक असेल तेव्हा पिकांना पाणी देणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.

द्राक्ष पिकाचे यश पाण्याच्या नियोजनावर अबलंवून असते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर मोरे यांनी नव्या तंत्राचा वापर करत भारनियमनाच्या समस्येवर मात केली आहे.

त्यांनी शेतात सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवला आहे. यासाठी 30 सौर पॅनल उभारले आहेत. या पंपामुळे 35 एकर द्राक्षबागेला गरज असेल तेव्हा पाणी देणे शक्य झाले आहे.

यापूर्वी भारनियमनामुळे रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागत असे; पण सौरऊर्जेवरील पंपामुळे ही अनियमितता संपली आहे. तथापि सौरप्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रचंड खर्च येतो.

सरकारने अनुदान दिले तरच अनेक शेतकर्‍यांना या प्रयोगाचे अनुकरण करता येईल, असे मत मोरे यांनी स्वानुभवाच्या आधारे व्यक्त केले आहे. त्यातील मर्म सरकार लक्षात घेईल का? भारतात आजही शेती पारंपरिक पद्धतीनेच केली जाते.

शेती आतबट्ट्याची ठरू लागल्याने शेतकर्‍यांची तरुण पिढी शेतीपासून दुरावत आहे; पण सरकारने शेती उद्योगात सक्रिय पाठबळ दिले तरच शेती करण्याच्या पद्धतीच्या कक्षा विस्तारतील.

तंत्रज्ञानाचा आधार घेत नवनवीन प्रयोग होऊ शकतील. यशस्वी प्रयोगांमुळेच शेती किफायतशीर करण्याचे नवे-नवे मार्ग निघू शकतात, हे मोरे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. शेतीतून दुरावणारी शेतकर्‍यांची नवी पिढी पुन्हा शेतीकडे आकृष्ट होण्यास प्रयोगशीलता आश्वासक ठरू शकेल.

LEAVE A REPLY

*