करिता सायास…!

0

प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत शासकीय सेवकांची काम करण्याची मानसिकता यंत्रणेचे यशापयश ठरवत असते. ती मानसिकता नेमकी कशी आहे याविषयी जनतेचे अनुभव पुरेसे बोलके आहेत; पण देशाचा जगव्याळ कारभार हाकणार्‍या यंत्रणेत जनहितासाठी चौकटीबाहेरचा दृष्टिकोन स्वीकारणारेही सेवक कार्यरत असतात.

जे नियत जबाबदारीही जागरुकतेने व नव्या कल्पनांच्या सहाय्याने पार पाडत असतात. त्यामुळे जनहिताची अनेक चांगली कामे उभी राहत असतात.

जगभर आरोग्यावर संशोधन सुरू असले तरी एड्सवर मात्र कोणतीही लस वा औषधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे या व्याधीला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य झालेले नाही.

पालक या व्याधीने संसर्गित असल्यास त्यांच्या बालकांनाही जन्मापासून या असाध्य व्याधीला तोंड द्यावे लागते; पण वैद्यकीय उपचारांच्या सहाय्याने 40 बालके निरोगी जन्माला घालण्याचा चमत्कार नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या एआरटी सेंटरने घडवला आहे.

त्यामुळे व्याधीग्रस्त पालकांच्याही आनंदाला पारावर उरलेला नाही. कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या तरुणींना, विशेषत: शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थिनींना छेडछाडीचा वा गुंडांच्या दहशतीचा सामना करावा लागतो.

हे प्रकार रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने ‘मर्दानी पथक’ नेमले आहे. या पथकात 16 महिला पोलिसांचा समावेश आहे.

या पथकाने शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. रोडरोमियोंचा बंदोबस्त करणे हे या पथकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे.

अनेक सर्वेक्षणांनी सरकारी शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकला आहे. राज्य शासनातर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत ‘शाळा सिद्धी’ नावाचा उपक्रम राबवला जातो.

नाशिक महापालिकेच्या 33 शाळांनी ‘अ’ श्रेणी मिळवली आहे. आधार जोडणी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आधार सक्तीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कदाचित त्यात तथ्य असूही शकेल; पण या योजनेच्या जनकाच्याही कल्पनेत नसेल असा फायदा समोर आला आहे. आधारकार्डमुळे 500 बेपत्ता बालकांना त्यांच्या घराचा शोध लागला आहे.

अनाथालयांमधील बालकांची आधार नोंदणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते काम सुरू असताना अनेक बालकांची आधार नोंदणी आधीच झाल्याचे आढळून आले.

त्यामुळे बालकांना त्यांच्या घरी पोहोचवणे यंत्रणेला सहज शक्य होणार आहे. यंत्रणेतील हितसंबंधांना मागे सारत जनहिताला प्राधान्य द्यायला विलक्षण धाडस लागते. मेहनत घ्यावी लागते.

शासकीय सेवकांमधील ही वृत्ती अशीच जोपासली गेली तर असाध्य ते साध्य होऊ शकते हे या घटनांनी व संबंधित सेवकांनी सिद्ध केले आहे.

LEAVE A REPLY

*