क्रीडाक्षेत्रातील नवचैतन्य !

0

भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे क्रीडाक्षेत्र सध्या नवचैतन्याने सळसळत आहे. भारताचा धावपटू टी. गोपी याने आशियाई मॅरेथॉन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने 2 तास 15 मिनिटे 48 सेकंदांची वेळ नोंदवली.

अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष धावपटू आहे. ही स्पर्धा चीनमध्ये पार पडली. गुवाहाटीत महिला युवा जागतिक स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत नीतू, ज्योती गुलिया, साक्षी चौधरी, शशी चोप्रा या खेळाडूंनी सुवर्णपदकांवर तर नेहा यादव व अनुपमा यांनी कांस्यपदकांवर नाव कोरले.

भारतीय महिला कबड्डीपटूंनी कोरियन कबड्डीपटूंना तर पुरुष कबड्डीपटूंनी पाकिस्तानी कबड्डीपटूंना धूळ चारून आशियाई स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले.

सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. महिला संघाचे नेतृत्व मुंबईच्या अभिलाषा म्हात्रेने केले होते. ही राज्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे.

भारत-श्रीलंकादरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी कर्णधार विराट कोहलीने द्विशतक झळकावले.

भारतातील खेळ व खेळातील राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, पण भारतही खेळात कासवाच्या गतीने का होईना दमदार पावले टाकत आहे हे या यशामुळे जागतिक क्रीडाक्षेत्राने मान्य केले असेल.

भारतीय खेळाडूंच्या यशापयशाला कारणांचे, विविध मुद्यांचे व राजकारणाचे अनेक पदर असतात. काही कारणे खेळाडूंच्या अखत्यारीतील तर काही समस्या सोडवणे त्यांच्या क्षमतेपलीकडचे असते, हे घटकाभर मान्य केले तरी खेळातील अपयश क्रीडा रसिकांना खड्यासारखे बोचते.

या यशामुळे ती बोच कमी होणार आहे. भारतीय क्रीडा रसिकांचे आयुष्य क्रिकेटने व्यापले आहे. त्यामुळेच क्रिकेटमधील एखाद्या चौकाराचीही चर्चा होते, पण सायना नेहवाल, मेरी कोम, सुशीलकुमार, अभिनव बिंद्रा अशा अनेक खेळाडूंनी आपल्या पराक्रमामुळे बॅडमिंटन, बॉक्सिंग, कबड्डी व नेमबाजी या खेळांचीही दखल क्रीडा रसिकांना घ्यायला लावली आहे.

विद्यार्थी खेळाडूंची पावले या खेळांकडे वळत आहेत. कविता राऊत, ताई बामणे, किसन तडवी, मोनाली गोर्‍हे यांसह अनेक नाशिककर खेळाडूंनी नाशिकचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.

नाशिक परिसरात खेळांची आवड निर्माण करण्याचे व खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांना उत्तम खेळाडू बनवण्याचे बरेचसे श्रेय नुकतेच दिवंगत झालेल्या ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ञ भीष्मराजजी बाम यांना नाशिककर निश्चितच देतील.

खेळामुळे संघभावना विकसित होते. आत्मविश्वास बळावतो. आत्मसन्मान वाढतो. आरोग्य सुधारते. हे लक्षात घेता सध्या राजकारणात चालू असलेला खेळखंडोबा निदान खेळ व खेळाडूंच्या वाट्याला येऊ नये एवढी माफक अपेक्षा जनतेने शासनाकडून करावी का?

LEAVE A REPLY

*