सावळागोंधळ !

0

कुरघोडीचे राजकारण व राजकारण्यांच्या उलटसुलट कोलांटउड्यांमुळे जनतेचा संभ्रम वाढत आहे. ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ असा उपदेश संतांनी केला आहे, पण उलटसुलट विधाने करून जनतेचे मनही अस्थिर करण्याचा अस्थानी उपद्व्याप सध्या सुरू आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी बुद्धीला कृत्रिम पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न काही देशांनी चालवला आहे. न्यूझीलंडमधील वैज्ञानिकांनी रोबोट नेता विकसित केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या रोबोट नेत्याने अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत या रोबोट नेत्याला उमेदवारी देण्याचा विचार आतापासून सुरू झाला आहे.

‘सोफिया’ या यंत्रमानवाला सौदी अरेबिया देशाने नागरिकत्व बहाल केले. मानवनिर्मित ‘सोफिया’ने आपल्या वाक्चातुर्याने जगाला थक्क केले, पण भारतीय राजकारणी व तथाकथित धर्ममार्तंडांनी जनतेच्या डोक्याचे वांगे करण्याचे मनावर का घेतले असेल? एकमेकांच्या अधिकार क्षेत्रावरुन शासन, प्रशासन व न्यायसंस्थेत विसंवाद निर्माण झाला आहे.

न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी राष्ट्रीय न्यायिक आयोग नेमण्याचा कायदा सर्वोच्च न्यायसंस्थेने घटनाबाह्य ठरवला व शासनकर्ते अस्वस्थ झाले.

वाढत्या लोकसंख्येच्या भाराने जगापुढील समस्या अधिकच बिकट होत आहेत. ‘लेकुरे उदंड जाहली। तो ते लक्ष्मी निघोन गेली। बापुडी भिकेला लागली। काही खावया मिळेना।’ असे सांगत समर्थ रामदास स्वामींनी जनतेला संतती सीमित ठेवण्याचा सल्ला शेकडो वर्षांपूर्वी दिला होता, पण हिंदू समाजाने हा सल्ला मनावर घेतला नाही.

त्यामुळे भारताची लोकसंख्या हीच देशविकासातील मोठी समस्या बनली आहे. तरीही ‘प्रत्येक हिंदूने चार मुले जन्मास घालावीत’ असा मासलेवाईक सल्ला उडूपी येथे सुरू असलेल्या धर्मसंसदेत चर्चेचे केंद्र बनला आहे.

अनेक देशांत फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली गेली आहे. मात्र भारतात गोहत्येसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्याने करावी, अशी मागणीही धर्मसंसदेने केली आहे.

या संसदेला अनेक राजकारणी व सत्तारूढ उपस्थित आहेत. घटनेचा पुरस्कार सगळेच करत असले तरी घटनेचा अर्थ लावण्याच्या प्रत्येकाच्या भूमिकेत कमालीची तफावत का? देशात जागोजागी झुंडशाही वेगाने वाढत आहे.

कायदा व सुव्यवस्था किंबहुना, राज्यघटनेचा बडेजाव करणारेसुद्धा त्या झुंडशाहीचे कळत-नकळत समर्थन कसे करतात? जागतिक महात्तेचे गाजर दाखवणारे राजकीय पक्षनेतेही झुंडशाहीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करू इच्छितात हे ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून देशात सुरू असलेली धूळवड पाहता स्पष्ट होते. देशाचे कायदे व घटना धाब्यावर बसवणारा हा सावळागोंधळ कोण निस्तरणार?

LEAVE A REPLY

*