कडू कारले तुपात तळले…!

0

वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम थांबवण्याचा दुर्दैवी निर्णय या मोहिमेचे जनक अ‍ॅड. आफरोज शाह यांना घ्यावा लागला आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहीम जाहीर झाली.

त्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी सहा वकिलांनी पुढाकार घेतला. वेसावा कोळी जमात ट्रस्ट व वर्सोवा रेसिडेंटस् व्हॉलेंटिअर्स यांच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची उदात्त मोहीम सुरू झाली.

मात्र कार्यकर्त्यांनी गोळा केलेला सुमारे शंभर टन कचरा चार महिन्यांपासून समुद्रकिनार्‍यावर पडून आहे. परिसरातील गुंड कार्यकर्त्यांना धमक्या देऊ लागले. त्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली गेली; पण स्वच्छतेबद्दल प्रशासनाची आस्था जागी होऊ शकली नाही.

एका वकिलांच्या मार्गदर्शनाखाली जनतेने उभारलेली स्वच्छता मोहीम प्रशासनाच्या असहकार्यामुळे थांबवली गेली आहे. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची अवस्था काय आहे हे स्पष्ट करण्यास वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेची झालेली वाताहत कोण लक्षात घेणार? गेली तीन वर्षे पंतप्रधान या मोहिमेचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

‘समुद्रकिनारा स्वच्छतेची जगातील सर्वात मोठी मोहीम’ असा वर्सोव्याच्या मोहिमेचा गौरव संयुक्त राष्ट्र संघाने केला होता. ‘मनकी बात’मधून पंतप्रधानांनीदेखील दखल घेतली होती.

या मोहिमेत सहभागी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला होता; पण या कशानेही प्रशासन प्रभावित झाले नाही.

कुणी काहीही म्हटले तरी प्रशासन आपल्याच गतीने चालणार याचे विदारक चित्र ‘स्वच्छ भारत’ मोहिमेतील जनतेच्या सहभागाबद्दल सक्रियपणे तुच्छता व्यक्त करून प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांनी जनतेला वाकुल्या दाखवल्या आहेत.

कितीही आकर्षक योजना आखल्या तरी त्यांची पद्धतशीर वासलात लावण्यात प्रशासन कंबर कसून तयार असते याचेच हे आणखी एक ढळढळीत उदाहरण! दैनंदिन जगण्याचा प्रश्न जनतेला दिवसेंदिवस जास्तच भेडसावत आहे.

साहजिकच समाजासाठी काही करावे ही भावना लोप पावत आहे. अशाही प्रतिकूल परिस्थितीत अ‍ॅड. आफरोज शाह यांच्यासारखी काही समाजाभिमुख माणसे ‘स्वच्छ भारत’सारख्या मोहिमेत उत्साहाने सामील होतात; पण त्यांना हतोत्साह करण्याचे काम संबंधित यंत्रणा काटेकोरपणे करतात.

देशाच्या उज्ज्वल भविष्याचे नेत्यांचे स्वप्न आणि ‘अच्छे दिन’ पाहण्याची जनतेची अपेक्षा पुरी होण्याच्या मार्गात किती प्रचंड अडथळे उभे आहेत याची कल्पना देण्यास वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम हा एक उत्तम आरसाच ठरावा.

अशा घटनेबद्दलचे वृत्त समजल्यावर ‘कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडू ते कडूच’ या लोकप्रिय पुरातन वाक्प्रचाराची आठवण झाल्याशिवाय कशी राहील?

LEAVE A REPLY

*