थोरांचे पोर(कट) खेळ !

0

राजकारणातील थोरांचा पोरखेळ सध्या चांगलाच रंगात आला आहे. एकमेकांना विनोदी खो देण्याची चढाओढ त्यांच्यातच लागली आहे. जनतेची अवस्था ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशीच कायम आहे.

सामान्य माणसांचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत. जनतेच्या चिंता दूर करणे ही खरे तर जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींची घटनात्मक जबाबदारी! सध्या ती त्यांनी भलतीच मनावर घेतलेली दिसते.

जनतेच्या समस्या सोडवू शकत नसलो म्हणून काय झाले? विनोद सांगून हसवायला ‘निधी’ कुठे लागतो? त्यामुळेच विनोदी वक्तव्ये करून जनतेच्या दु:खांवर फुंकर घालून डागण्या देण्याचा उद्योग राजकारण्यांनी हाती घेतला असावा. यानिमित्ताने देशातील ‘एका मिनिटात’ विद्वान व संशोधक बनणार्‍यांची संख्या अचानक वाढीस लागली आहे.

राजकारणात रंगलेल्या विनोदी मालिकेत एकाचढ एक विनोद सादर होऊ लागले आहेत. कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक संशोधकांनी हयात वेचली; पण आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मात्र हे संशोधन मोडीत काढले आहे.

‘केलेल्या पापांची देव शिक्षा देतो. म्हणून आपल्याला कर्करोग होतो. त्या-त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढवते. हा दैवी न्याय आहे. अनेकदा कॅन्सर होणार्‍या व्यक्तीची त्यात काहीच चूक नसते.

त्याच्या आई-वडिलांनी पाप केले असेल तरी त्याची शिक्षा अपत्यांना भोगावी लागते. कर्माची फळे या जन्मातच भोगावी लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका नाही’ असा जावईशोध त्यांनी जाहीर केला आहे.

त्याच्या समर्थनार्थ त्यांनी धर्मग्रंथांचा हवाला दिल्यामुळे केवळ संशोधकांचीच नव्हे तर त्यांच्या पक्षधुरिणांचीही बोलती बंद झाली आहे. विनोदाचे असतील नसतील तेवढे सगळे प्रकार राजकारण्यांनी उपयोगात आणायचे ठरवलेले दिसते.

पंतप्रधानांकडे बोट दाखवले तर बोट तोडून टाकण्याची धमकी खासदार नित्यानंद राय यांनी दिली आहे. आता बोटे वाचवण्यासाठी जनतेला बहुतेक हातमोजे घालून फिरायला हवे.

राजकारण्यांच्या अशा विलक्षण शोधप्रक्रियेमुळे देशभरातील संशोधक व वैज्ञानिक, विनोदवीर, विनोदी लेखक यांच्या मनात हीन भावना (इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स) निर्माण झाली नसेल तरच नवल!

इतके चांगले संहितालेखन दिव्यदृष्टीचा नेतेगण करीत असताना परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्याची गरजच काय? येत्या काळातील संशोधनाची तसेच विनोदी लेखन आणि वक्तृत्वाचे सगळेच पुरस्कार रोज नवे-नवे शोध जाहीरपणे बरळणार्‍या नेत्यांनाच देण्याचा बाका प्रसंग राज्यकर्त्यांवर ओढवणार का? तसे नाही केले तर थोरांच्या बालबुद्धीची कदर कोण करणार?

LEAVE A REPLY

*