अनाकलनीय गुंता !

0

देेशाच्या राजधानीतील दुर्दैवी ‘निर्भया’ घटनेला पाच वर्षे उलटली तरीही अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात शासन असमर्थ का ठरले असावे? त्या प्रकरणामुळे निर्भया कायदा पास झाला.

‘निर्भया निधी’ शासनाने निर्माण केला; पण तोही केवळ देखावाच ठरत आहे का? भुसावळ तालुक्यातील बोहर्डी बु। येथील मुख्याध्यापकाने तिसरीत शिकणार्‍या 11 विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

मुलींची वैद्यकीय तपासणी झाली. मुख्याध्यापकाला अटकही झाली. मालेगाव शहरात परवा एकाच दिवशी लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल झाले.

‘निर्भया’ प्रकरण 2012 मध्ये घडले. त्यावर्षी सरकारी आकडेवारीनुसार देशात महिला अत्याचाराचे 24 हजार गुन्हे नोंदवले गेले होते. 2015 मध्ये हीच संख्या 36 हजारांवर गेली.

त्यापुढची आकडेवारी अद्याप जाहीर व्हायची आहे. लैंगिक छळाला बळी पडलेल्या महिलांच्या मदतीसाठी ‘निर्भया निधी’ स्थापन केला गेला; पण त्या निधीची 3100 कोटींची रक्कम वापराविना पडून आहे.

या निधीतून देशातील 900 पेक्षा जास्त रेल्वेस्थानकांवर कॅमेरे लागणार होते. 112 क्रमांकाची युनिव्हर्सल हेल्पलाईन सुरू होणार होती. सायबर लैंगिक छळ रोखण्यासाठी धोरण आखले जाणार होते. महिला पोलीस स्वयंसेवक नेमले जाणार होते. ही सगळी फक्त कागदी आश्वासने ठरली आहेत.

अनेकवेळा सरकारी खजिना रिता असल्याची बतावणी केली जाते. निधीअभावी शेतकरी कर्जमाफी अद्यापतरी ‘बोलाचा भात’ ठरली आहे. मात्र मंजूर ‘निर्भया निधी’ अखर्चित कसा राहतो?

लैंगिक अत्याचाराची घटना घडली की समाजात त्याची तात्कालिक प्रतिक्रिया उमटते. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात.

निर्भया प्रकरणातही हेच घडले होते. हा जनक्षोभ शांत करण्यासाठी सरकारकडून उपायोजना जाहीर केल्या जातात; पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी मात्र कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत, असे व्रत सरकारने स्वीकारले असावे का?

की महिलांची सुरक्षा ही सरकारच्या दृष्टीने नगण्य बाब ठरत असेल? महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांना संवेदनशीलतेचे धडे देण्याची गरजही न्यायालयाने बोलून दाखवली आहे;

पण अनेक गंभीर गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग उघड होऊ लागल्याने त्या यंत्रणेची विश्वासार्हतादेखील धोक्यात आली आहे. ‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती देशात का निर्माण व्हावी?

एकंदरीतच नको ते प्रश्न उभे करून समाजाचे लक्ष विचलित करण्याच्या सामूहिक प्रयत्नांमुळे महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न सर्वस्वी दुय्यम ठरत असेल का? हा सगळा अनाकलनीय गुंता कोण आणि कधी सोडवणार?

LEAVE A REPLY

*