य : क्रीयावान स पंडित :

0

सकारात्मकता व नकारात्मकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नकारात्मकता व भ्रष्ट व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडत बदलाची जबाबदारी टाळणार्‍यांचीच संख्या समाजात दुर्दैवाने जास्त आहे;

पण अनेक संस्था गेली कित्येक वर्षे आपापल्या परीने सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील ‘नाही रे’ वर्गाच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम चालवत आहेत.

मारवाडी युवा मंच हा त्यापैकीच एक! शारीरिक अपंगत्वासहित जगणार्‍यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक असतात. परावलंबी जिणे त्यांच्या आयुष्याला वेढून टाकते.

जगण्याच्या प्रत्येक क्षणी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा अपंगांसाठी कृत्रिम अवयवांच्या मोफत प्रत्यारोपणाचा उपक्रम मारवाडी युवा मंचतर्फे दरवर्षी चालवला जातो.

गेल्या सहा वर्षांत कृत्रिम अवयवांच्या आधारे दहा हजार दिव्यांगांना युवा मंचने स्वावलंबी बनवले आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश आदी राज्यांतही मंचतर्फे हा उपक्रम राबवला जातो.

उन्हाळ्यात माणसांसह पशू-पक्ष्यांना थंड पाणी प्यायला मिळावे म्हणून ‘अमृतधारा’ प्रकल्पही मंच राबवतो. शहरात ठिकठिकाणी पाणपोया तर ‘पशू अमृतधारा’अंतर्गत प्राणी-पक्ष्यांसाठी सिमेंटचे हौद उभारले जातात.

शेकडो अमृतधारा जलपात्रांचे वितरण केले जाते. सकल मारवाडी युवा मंचने जलपुनर्भरण प्रकल्प हाती घेतला आहे. या
मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांत पुनर्भरण प्रकल्प उभारले जात आहेत.

केवळ मारवाडी युवा मंचच नव्हे तर अशा अनेक संस्था व व्यक्तीसमूह असे सेवाभावी उपक्रम राबवतात. समाजाच्या भल्यासाठी स्वत:च्या व अनेकांच्या खिशाला खार लावत झटतात.

अशा अनेक संस्थांचे उपक्रम प्रेरणादायी व चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणारे आहेत; पण राजकारणात गुरफटलेल्या समाजाला व संधिसाधू राजकारण्यांना अशा उपक्रमांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ असतो कुठे?

त्यामुळेच अनेक संस्थांचे कार्य व्यापक स्तरावर चर्चिले जात नसावे. कदाचित त्यामुळेच ती कामे वर्षानुवर्षे सुरळीत चालत असावीत. अशा संस्थांचे कार्यकर्ते ‘घेतला वसा सुफळ संपूर्ण’ करत असतात. अशा उपक्रमांना सामाजिक पाठबळाची गरज असते. ते नेहमी आर्थिक स्वरुपातच अपेक्षित असते असे नाही.

कोणतेही सामाजिक कार्य पार पाडण्यासाठी अर्थबळ तर अपरिहार्य असतेच; पण मनुष्यबळ, मार्गदर्शक, तंत्रज्ञ व अनुभवी व्यक्तींचे योगदानही आवश्यक असते.

‘साथी हाथ बढाना’ हा दृष्टिकोन समाजाने स्वीकारला तर अनेक संस्था अशा कामांचा विस्तार आणखी वाढवू शकतील.

LEAVE A REPLY

*