हेच लोककल्याणकारी राज्य ?

0

राज्य नेमके कोणाचे सुरू आहे हे जनतेला का कळेनासे झाले असावे? सरकारकडून राज्य चालवले जात आहे, असा अनुभव जनतेला का येत नसावा? अनेक ठिकाणी कंत्राटदारच शिरजोर झाले आहेत.

थेट आमदारांकडेच लाच मागण्याइतकी झारीतील शुक्राचार्यांची हिंमत वाढली आहे. भ्रष्टाचार्‍यांना वेसण घालण्याऐवजी भ्रष्टाचाराची कबुली देण्याइतकी हतबलता व्यक्त करण्याची अगतिकता शासनावर का ओढवली?

आर्थिक हितसंबंधांचा गुंता इतका वचरढ कसा झाला? दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने बांधलेला पूलच तोडल्याची घटना पुसद तालुक्यातील शेंबाळ-पिंपरी गावात घडली आहे.

कंत्राटदाराने आधी बांधलेला पूल निकृष्ट दर्जामुळे तीन महिन्यांतच कोसळला होता. ग्रामपंचायतीच्या दबावाने कंत्राटदाराने मामुली डागडुजी केली; पण त्याचे पैसे अडवताच पूल पाडून त्याने वचपा काढला.

महाड दुर्घटनेला वर्ष लोटले तरी मुंबई-गोवा महामार्गावरील 13 ब्रिटीशकालीन पूल अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सायन-पनवेल महामार्गावरील टोल प्रकरणी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी नियम बदलले गेले.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांचे उखळ त्यात पांढरे झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांना द्यावी लागली. या महामार्गावरील टोल तब्बल 500 कोटींनी वाढवला गेला होता.

जातपडताळणीच्या एका प्रकरणात शिवसेनेच्या आमदाराकडे दीड कोटीची लाच मागितली गेल्याची माहिती विधानसभेतच सांगितली गेली आहे. राज्यात 36 जातपडताळणी समित्या आहेत.

त्यातील बहुतेक समित्यांवर अध्यक्ष का नेमले गेले नसावेत? शासनाचे घोडे या प्रकरणांतही वरातीमागूनच धावत आहे. या सगळ्या प्रकरणांत चौकशीचे आदेश म्हणे दिले गेले आहेत.

काय होते अशा आदेशांचे पुढे? खरेच चौकशी होते का? त्याची माहिती विधानसभेत तरी दिली जाते का? की आमदार मंडळीसुद्धा चौकशीच्या घोषणेवर हुरळून जातात व नंतर मूळ विषयच विसरतात? आतापर्यंत चौकशीच्या घोषणांपैकी किती चौकशा पुर्‍या झाल्या?

किती दोषी सापडले? त्यापैकी कितींवर कारवाई झाली? हे सर्व थंड्या बस्त्यात का राहावे? मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशावरच न्याय मागण्याची वेळ आली आहे. 15 महिन्यांत चौथ्यांदा बदली झाल्याने संबंधित न्यायाधिशांनी धरणे धरले आहे.

शासन आणि प्रशासन नेहमीच तुपाशी; पण ज्या जनतेेच्या नावाने हा सारा खेळ रंगतो ती जनता मात्र कायम उपाशीच ठेवली जाणार का? लोककल्याणकारी राज्याचा असा अनुभव कधी बदलणार?

 

LEAVE A REPLY

*