शाब्बास सांसद सुप्रियाताई !

0
संंसदेतील कामाचा दर्जा कायम राहावा व लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करण्याची संधी जनतेला उपलब्ध व्हावी या उद्देशाने संसदेतील कामकाजाचे प्रक्षेपण जनतेसाठी खुले केले गेले; पण त्यातून उमटलेले संसदेचे चित्र मात्र विपरित व अस्वस्थ करणारे आहे.
संसदेतील कामकाजाचा दर्जा दिवसेंदिवस जाणत्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे. सभागृहात घातला जाणारा धिंगाणा, हाणामार्‍या, राजदंड पळवण्याचे प्रयत्न हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या निवृत्तीपूर्व भाषणात याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली होती. संसदेत दर्जेदार भाषणे व वाक्पटुत्व दुर्मिळ होत चालल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय संसदेला संसदपटूंची मोठी परंपरा आहे. सध्याच्या बर्‍याच सदस्यांना विसर पडलेल्या या परंपरेला महाराष्ट्र कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र झळझळीत उजाळा दिला आहे.

तथाकथित गोरक्षकांचा धुमाकूळ, त्यांनी माजवलेली दहशत, नेतमंडळींनी व विशेषत: महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांनी या प्रकरणात साधलेली चुप्पी याचा समाचार सुप्रियांनी झणझणीत; पण सारगर्भ शब्दांत घेतला.

त्यांचे भाषण उत्कृष्ट संसदपटूचा परिचय करून देणारे तर होतेच; पण माजी राष्ट्रपतींसारख्या जाणत्यांच्या मनात आशा निर्माण करील इतके प्रगल्भ होते.

हरियाणा, राजस्थान, छत्तीसगडसह अनेक राज्यांत तथाकथित गोरक्षकांच्या दहशतीच्या घटना घडल्या. तेव्हा त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल बोलण्याचे धैर्य तरी दाखवले.

आरोपींना शिक्षा केली जाईल, असे सांगत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मग ते प्रकरण हरियाणातील जुनैदखानचे असो वा राजस्थानातील! महाराष्ट्रातही अशा अनेक घटना घडल्या.

नागपूरमधील भारसिंगी गावात सलीम इस्माईल शाह या भाजप कार्यकर्त्यास गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून तथाकथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना जुलैत घडली; पण प्रगत महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी याबाबत सोयीस्कर मौन पाळले.

चकार शब्दही उच्चारला नाही, असे सांगून सर्व खासदारांना त्यांनी स्तंभीत केले. अनेक मुद्यांचा प्रखरपणे समाचार घेणारे सुप्रियाताईंचे भाषण संसदेच्या दप्तरी एक दर्जेदार व अभ्यासपूर्ण भाषण म्हणून नमूद झाले आहे.

संसदेच्या कामकाजाला चिंताजनक उतरती कळा लागलेली असताना काही चमकदार युवा नेते मात्र आपल्या अभ्यासूपणाने व उत्कृष्ट वक्तृत्वाने चमकू लागले आहेत.

दुर्दैवाने अशा दर्जेदार भाषणांना संसदेतील गोंधळाइतकी प्रसिद्धी देण्याचे दर्जेदारपण सध्या माध्यमांमध्येसुद्धा अभावाने आढळते.

तथापि सगळ्या आशा संपलेल्या नाहीत, असा दिलासा निर्माण करणार्‍या सुप्रियाताई सुळेंचे मन:पूर्वक अभिनंदन!

 

 

LEAVE A REPLY

*