वर्णिकाचे स्वसंरक्षणाचे मर्म

0

चंंदिगडमधील आयएएस अधिकार्‍याच्या मुलीचा पाठलाग प्रकरणी अखेर जनक्षोभ कामी आला. मुलीचा पाठलाग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याबद्दल हरयाणा भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याचा साथीदार आशीषकुमार या दोघांवर अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. याआधी आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यंत्रणेवर टीकेची झोड उठली होती. याप्रकरणाची चौकशी होईल आणि दोषींना शासन होईल, अशी जनतेला आशा आहे.

या प्रकरणाचा धाडसाने व निर्भयतेने सामना केल्याबद्दल वर्णिका कुंडू ही युवती अभिनंदनास पात्र आहे. अनेकदा अशा प्रकरणात मुली गर्भगळित होतात.

तक्रार करण्यास नकार देतात. मुलींची नावे गुप्त ठेवण्याकडेच पालकांचा, समाजाचा व माध्यमांचा कल असतो, पण या सार्‍या गृहितकांना वर्णिकाने आणि तिच्या पालकांनी धक्का दिला आहे.

वर्णिकाचे पालक तिच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. मी काहीही गैर केलेले नसल्याने माझी ओळख का लपवून ठेऊ, असा प्रश्न तिने समाजासमोर उपस्थित केला आहे.

ही लढाई लढणे सोपे नाही. केवळ लोकांच्या पाठबळामुळेच मी हिंमत दाखवू शकले. समोर आले. माझी ओळख लपवली नाही. त्यामुळेही लोक माझ्या पाठिशी उभे राहिले.

मार्शल आर्ट येत असल्यामुळेच छेड काढणार्‍यांशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास आल्याचे तिने आवर्जून सांगितले. तिची प्रतिक्रिया समाजाचे डोळे उघडणारी, तरुणींना स्वसक्षमीकरणाचा मार्ग दाखवणारी व अशा घटनांकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलण्याचा प्रयत्न करणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जग बदलले आहे, असे म्हटले जात असले तरी पुरुषी मानसिकतेत मात्र फारसा बदल झाल्याचे अनुभवात नाही. अशा घटनांमध्ये बर्‍याचदा तरुणींकडेच कलुषित नजरेने पाहिले जाते.

घराबाहेर विपरित अनुभव येतात म्हणून नियमांचा जाच फक्त मुलींनीच सहन करावा आणि ‘सातच्या आत घरात’ यावे, अशी अपेक्षा ठेवणेच अन्यायकारक नव्हे का?

जगात हिमतीने आणि धाडसाने वावरायचे असल्यास स्वसंरक्षणाचे तंत्र शिकून घ्यायलाच हवे. स्वसंरक्षणाचे तंत्र तरुणींमध्ये आत्मविश्वास निर्माण करते.

कोणत्याही प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करते. हेच वर्णिकाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. हे मर्म पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

 

 

LEAVE A REPLY

*