लाड तरी किती ?

0

पंचवटी एक्स्प्रेस मुंबईत उशिरा पोहोचणे हा नित्याचा शिरस्ता झाला आहे. 29 जुलैलाही पंचवटी एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावत होती. काही प्रवाशांनी रेल्वेच्या अ‍ॅपवरून तसेच ट्विट करून तक्रार केली होती.

त्याची दखल घेत पंचवटीला उशीर करणार्‍या कर्मचार्‍याला तात्काळ निलंबित करण्यात आले. रेल्वेचा एखादा सेवक एक्स्प्रेस गाडीचे वेळापत्रक बिघडवू शकतो? या गाडीच्या उशिरा धावण्याने मुंबईत काम करणारे सरकारी सेवक वेळेत पोहोचू शकत नाहीत, अशी ओरड नेहमीच केली जाते.

सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 आहे. एक्स्प्रेस रेल्वेगाड्या फक्त सरकारी सेवकांसाठी धावतात किंवा धावल्या पाहिजेत हा समज कसा फोफावला? सरकारी सेवक हे जनतेचे सेवक असतात; पण सेवक खरेच तसे वागतात का? सारेच सेवक कामचुकार असतात असे नाही; पण कार्यक्षम सेवकांपेक्षा कामचुकार सेवकांची संख्या अनेक पटीने असावी, असा जनतेचा समज आहे.

सरकारी सेवक वेळेवर त्याच्या जागेवर सापडणे हे दिव्य कर्म बनले आहे. एकदा सरकारी नोकरीत दाखल झालेल्याची आयुष्याची चिंता संपली असे का मानले जावे? सरकारी सेवकाने कामाची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे ही अपेक्षा कितीपत पुरी होते? जनतेची कामे वेळेवर पूर्ण करण्याऐवजी कामे वेळेवर होऊच नयेत यासाठी सरकारी झारीत जागोजागी कामाला विलंब करणारे शुक्राचार्यच का आढळावेत? नाशिक मनपाने श्रावणी सोमवारनिमित्त कामकाजाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 अशी केली आहे.

वेळेतील बदल कोणत्या नियमानुसार केला हे कुणा मनपा सदस्याने विचारल्याचे ऐकिवात नाही; पण हा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून इमानेइतबारे सुुरू आहे.

परवा पहिल्या सोमवारी बहुतेक कर्मचारी जेवणाच्या सुटीनंतर कार्यालयात आलेच नाहीत. त्यामुळे विशाल मनपा कार्यालयात सर्वत्र सामसूम होती.

कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना हात हलवत परत जावे लागले. कार्यालयीन वेळेत पोहोचता आले नाही तर खापर पंचवटी एक्स्प्रेसवर का फोडले जावे? वेळेवर हजर राहणे ही सेवकाची जबाबदारी की पंचवटी एक्स्प्रेसची? अलीकडच्या बहुतेक सरकारी योजना आणि घोषणा अंमलबजावणीअभावी फक्त कागदावर उरतात.

कर्तव्यपालनाची जबाबदारी पार न पाडणार्‍या सरकारी सेवकांवर सवलतींचा वर्षाव सतत होत असतो. कामात तत्परता जाणवते ती फक्त वरकमाईच्या वसुलीसाठी! त्यात शासन आणि प्रशासन आपली कार्यक्षमता पणाला लावते. तरीही सरकारी सेवकांचे आणखी किती लाड होत राहणार?

 

 

LEAVE A REPLY

*