ब्ल्यू व्हेल गेमचा विळखा घट्ट होत चालल्याचे सिद्ध करणारी घटना सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सोलापुरातील 14 वर्षीय मुलगा घरातून नाहीसा झाला होता. पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
तो ‘ब्ल्यू व्हेल गेम’मध्ये फसल्याचा अंदाज त्याच्या मोबाईलच्या आधारे पालकांनी व्यक्त केला आहे. याच गेमच्या नादात एका मुलाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला होता.
हा खेळ थांबवण्यासाठी कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, पण ऑनलाईन विश्वातील गुंतागुंत लक्षात घेता वास्तवात असे घडण्याची शक्यता धुसर असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

मुलांच्या भावविश्वात पालकांना जागा का राहिली नाही? पालक आणि मुलांमधील संवाद का हरवला? कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करता-करता मानसिक आणि भावनिक पोषण गरजेचे वाटेनासे झाले असावे का?

मुलांना आभासी जगाचे आकर्षण का वाटू लागते? त्यांच्या हातात ही साधने देताना परिणाम-दुष्परिणामांचा विचार होत नसेल का? असे अनेक प्रश्न या घटनांमुळे निर्माण झाले आहेत.

त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न संबंधित घटकांनी करायला हवा. बदलत्या काळानुसार वेगवान जीवनशैलीचा स्वीकार पालकांसाठी अपरिहार्य ठरला आहे.

अनेकांना एकच मूल असते. बहुतांश घरांत दोन्ही पालक कमावते असतात. त्यामुळे ते बराच काळ घराबाहेर असतात. परिणामी मुलांकडे भरपूर वेळ आणि पालकांकडे क्षणाची फुरसत नाही हेच बहुतेक घरांमधील वास्तव आहे.

ही कमतरता मुलांच्या हातात आधुनिक साधने सोपवून कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या साधनांच्या मदतीने मुले हळूहळू एकटी पडत जातात.

पुढे आभासी भावविश्वात रमू लागतात हे पालकांच्या लक्षात येईपर्यंत अनेकदा बराच उशीर झालेला असतो. यासंदर्भात मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी अनेक पालक हा प्रश्न त्यांच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळेही या प्रश्नांमधील गुंतागुंत वाढत आहे. मुलांना इंटरनेटचे, गेमचे वेड का लागते याचा शोध घ्यायला हवा. ते वेड कमी करण्यासाठी अभिनव कल्पना शोधायला हव्यात.

पालक मुलांच्या पाठिशी उभे आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध व्हायला हवे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक अहोरात्र कष्ट घेत असतात.

मग त्याच मुलांच्या भावनिक आणि मानसिक भरणपोषणासाठी पालकांनी वेळ काढायलाच हवा. पालकांना ज्या दिवशी हे समजेल त्या दिवसापासून ‘ऑनलाईन’चा गुंता सुटायला लागेल.

 

 

LEAVE A REPLY

*