पारदर्शक पळवापळवी

0

पारदर्शक कारभाराचा हवाला देत राज्यात युतीचे सरकार आले त्याला आता तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत. अपयश आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मागच्या सरकारचे वाभाडे काढणे हेच जणू अनेकांचे काम झाले आहे.

पण युती सरकारच्या कारभारातही सारे काही आलबेल नसल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. दरवर्षी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकार दरबारी अनेक अर्ज दाखल होत असतात.

त्यादृष्टीने सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे अर्जांची छाननी, नियमांची तपासणी, प्रत्यक्ष पाहणी दौरे आयोजित केले जातात. अटी-नियमांची पूर्तता होते आहे की नाही ते तपासले जाते.

त्यानंतरच परवानगी दिली जाते. पण पुढार्‍यांशी संबंधित 13 महाविद्यालयांना नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिल्याची चित्तरकथा इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राने आपल्या 6 ऑगस्ट 2017 च्या अंकात छापली आहे.

ही माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा आधार घेतला गेल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या सर्व महाविद्यालयांना सरकारी नियम आणि अटींची पूर्तता करत नसल्याने सरकारच्याच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी नाकारली होती हे विशेष.

बेकायदा परवानगी दिलेल्या 13 महाविद्यालयांपैकी तीन भाजप प्रदेशाध्यक्षांची पत्नी चालवत असलेल्या ट्रस्टची, एक भाजपच्याच राज्यसभा सदस्यांच्या शिक्षण संस्थेचे, एक काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या सदस्याच्या शिक्षण संस्थेचे, अन्य असेच कोणत्या ना कोणत्या पुढार्‍यांचे आहेत.

यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री व प्रदेशाध्यक्षांना प्रश्न केला असता त्यांनी परवानगीचे समर्थन केल्याचे या चित्तरकथेत म्हटले आहे. यावरून जनतेने नेमका काय बोध घ्यायला हवा?

सरकार कोणत्याही पक्षाचे असो कारभार मात्र मागच्याच पानावरून पुढे सुरू आहे, गाडी तीच आहे फक्त चालक बदलला आहे असा अर्थ जनतेने काढला तर तो चूक म्हणता येईल का?

‘उडदामाजि काळे गोरे..काय निवडावे निवडणाराने’ अशी जनतेची अवस्था झाली आहे. या चित्तरकथेविरुद्ध ज्यांच्याकडे दाद मागायला हवी, ज्यांनी या प्रकरणात लक्ष घालणे अपेक्षित आहे त्यांनीच या प्रकरणाची पाठराखण केल्याने जनतेने कोणाच्या तोंडाकडे पाहावे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘न खाऊंगा..न खाने दुँगा’ या घोषणेमुळे जनतेच्या मनात जागृत झालेल्या आशा आजही कायम आहेत. या भूमिकेला छेद देणार्‍या या व अशा अनेक प्रकरणात त्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.

कारण प्रश्न पक्षाच्या जनमानसातील अधिष्ठानाचा आहे.

 

LEAVE A REPLY

*