परदु:ख शीतल…?

0

संरक्षण खात्याचा ‘अधिभार’ पेलणारे देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी केरळ दौर्‍यावर होते. त्यांचा हा दौरा राजकीय नव्हता. मात्र त्यांनी तेथे केलेल्या वक्तव्याने त्याला राजकीय रंग नक्कीच चढला.

केरळातील संघ कार्यकर्ता राजेश याची गेल्या आठवड्यात निर्घृण हत्या झाली. त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मंत्रिमहोदय तेथे गेले होते.

नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. केरळातील सत्ताधारी डाव्यांवर चौफेर हल्ला चढवला. ‘केरळसारखा राजकीय हिंसाचार भाजप वा एनडीएशासित राज्यांत घडला असता तर पुरस्कार वापसीचे सत्र सुरू झाले असते.

संसदेचे कामकाज रोखून धरले गेले असते. देशात व देशाबाहेर आंदोलने झाली असती’ असे उपरोधिक टोलेही त्यांनी लगावले.

केरळमधील संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या पूर्वनियोजित असल्याचा शोध त्यांना कसा लागला? काही दिवसांपूर्वी राजकीय हिंसाचारात बळी पडलेल्या एकवीस जणांच्या नातलगांनी याच दिवशी राजभवनाबाहेर सत्याग्रह केला.

पक्षभेद न पाळता जेटलींनी याही बळींच्या नातलगांची भेट घेतली असती तर ते पक्षपाती ठरले असते का? जेटली मंत्री असले तरी आधी ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.

वकिली युक्तिवादात ते तरबेज आहेत. देशात कुठेही घडणार्‍या हत्यांबाबत त्यांच्याकडून नि:पक्षपाती दृष्टिकोनाची अपेक्षा जनतेने करावी की संकुचितपणाची?

देशाची महत्त्वाची पदे भूषवणार्‍या व्यक्तीने पक्षीय पातळीवर येऊन इतका संकुचितपणा दाखवणे कोणाला बरा वाटेल? कोणताही हिंसाचार वाईटच! मात्र त्याबाबत उच्चपदस्थांचा आप-परभाव आक्षेपार्ह नव्हे का?

देशात एनडीएची सत्ता आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून विविध भागात हिंसाचार वाढले आहेत. निरपराध्यांना मारझोड तर नित्याचीच; पण अनेकदा अकारण जीव घेतले जात आहेत.

कधी गोमांसावरून तर कधी क्षुल्लक कारणांवरून मुस्लिम व दलितांना तथाकथित गोरक्षक आणि समाजरक्षक लक्ष्य करत आहेत. विविध विद्यापीठांनासुद्धा हिंसाचाराची युद्धभूमी बनवले जात आहे.

त्याबद्दल तसेच देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल जेटलींनी कधी खेद व्यक्त केला का? अशा घटनांत बळी गेलेले लोक भारतीयच होते ना?

त्यातील किती जणांच्या कुटुंबियांचे सांत्वन जेटली वा त्यांच्या सहकार्‍यांनी केले? किंबहुना अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे धोरण त्यांच्या भूमिकेवर संदेह निर्माण करते. ‘परदु:ख शीतल’ असे म्हणतात.

तोच दृष्टिकोन आतापर्यंतच्या हिंसांबाबत दाखवला गेला का? स्वपक्षीय वा परिवारातील व्यक्ती जाते तेव्हा दु:खाची जाणीव होते. विधिज्ञ जेटलींना ती जाणीव इतक्या उशिरा व्हावी?

 

 

LEAVE A REPLY

*