दूरदृष्टीने कार्य घ्यावे हाती..!

0

संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या सहाव्या अध्यायात मानव जन्माचे आणि लोकसहभागाचे मर्म सांगितले आहे. ते म्हणतात,

ईश्वरे जग निर्माण केले त्याचे कार्य अजूनि अपूर्ण
ते आपल्यापरी कराया पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा
तेव्हा काय करावे,
ती योजना आपण ठरवावी जे जे करणे असेल बरवे
ते दूरदृष्टीने शोधूनि पाहावे तेव्हा घ्यावे कार्य हाती

समाजातील अनेक सामाजिक संस्था व व्यक्तीसमुहांनी हे मर्म लक्षात घेत सामाजिक बदलांसाठी व सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे.

आप्तेष्टाच्या निधनानंतर दहावा आणि तेरावा करण्याची परंपरा सर्वत्र पाळली जाते, पण या परंपरेत काळानुरुप बदल करण्याचे धाडस अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक गावच्या सोनाग्रे कुटुंबियांनी दाखवले आहे.

श्रीकृष्ण सोनाग्रे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या तेरवीला होणार्‍या अनाठायी खर्चाला कुटुंबियांनी फाटा दिला.

तोच निधी वडिलांनी सेवा दिलेल्या जिल्हा परिषद शाळेला डिजिटल क्लासरुमसाठी उभारण्यासाठी देण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत प्रत्येक महाविद्यालयात जेंडर चॅम्पियनची नियुक्ती केली जाणार आहे.

महिला शोषणाच्या घटनांमध्ये किशोरवयीन मुलांची संख्या वाढती असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे चॅम्पियन विद्यार्थ्यांना महिलांचे हक्क व अधिकारांची माहिती देतील.

महिलांना सन्मान आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी प्रेरित करतील. सामाजिक जनजागृती घडवतील. सरकारी शाळांतील अनेक विद्यार्थी शालेय साहित्याअभावी गुणवत्तेची चमक दाखवू शकत नाहीत.

नाशिकच्या फैज मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेने ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने साडेसहा हजार गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप केले आहे. नवीन नाशिक वसाहतीतील दोन ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूपश्चात देहदानाचा संकल्प केला आहे.

जनसामान्यांच्या समस्या दूर करत त्यांचे जगणे सहज आणि सोपे करणे हे शासनाचे प्रधान कर्तव्य आहेच, पण फक्त शासनावरच अवलंबून राहाण्यापेक्षा व व्यवस्थेवर दोषारोपण करत राहाण्यापेक्षा लोकसहभागातून ठोस कृती करता येते, समस्या सुटू शकतात हेच या उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शासकीय योजनांमधील लोकसहभागाचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करत असतात. उपरोक्त उपक्रम निश्चितपणे प्रेरणादायी आहेत.

 

LEAVE A REPLY

*