जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोन महिला ठार

0
जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-जिल्ह्यात वेगवेगळय ठिकाणी झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. यात नाशिराबाद नजीक पॅजो रिक्षा उलटल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
यात महिलेच्या मुलांसह पॅजो रिक्षाचालक जखमी झाला आहे. तर दुसर्‍या घटनेत पारोळा जवळील दळवेल गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारला समोरून येणार्‍या 407 ने धडक दिली.
यात कारमधील महिला जखमी झाली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही महिलांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या दोन्ही घटनांबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, कासमवाडी परिसरातील रहिवाशी सिंधुबाई किसन गायकर वय 47 हया भाजीपाला विक्रेत्या असून त्या मुलगा ज्ञानेश्वर किसन गायकर वय 26 यांच्यासह नाशिराबाद येथे जात असतांना समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पॅजो रिक्षा उलटली.

यात सिंधूबाई गायकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मुलगा ज्ञानेश्वर व मालवाहू रिक्षाचालक रामेश्वर महाजन यांच्यासह दुचाकीस्वार तरुण देखील जखमी झाला आहे.

नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी कुटुंबियासह नातेवाईकांनी आक्रोश केला.

दुसर्‍या घटनेत वाघ नगर मधील रहिवाशी असलेले सुरेश धनसिंग पाटील वय 41 यांचे मु.जे कॉलेजजवळ जयभद्रा टी स्टॉल म्हणून चहाचे दुकान आहे.

ते त्यांची पत्नी मंदाकिनी पाटील यांच्यासह भाचीला भेटण्यासाठी दि.22 रोजी दुपारी धुळे येथे जाण्यासाठी एम एच 45 ए 9918 या स्विफ्ट डिसायर कारने निघाले होते.

पाऊस सुरु असल्याने पारोळा जवळील दळवेल गावाजवळ पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी अचानक उजव्या बाजुला असलेल्या पेट्रोल पंपांकडे वळत असतांना समोरून येणारा एम एच 19- 4806 क्रमाकांच्या 407 ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

यात दोन्ही पती-पत्नी जखमी झाले. दोघांना उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आज सकाळी मंदाकिनी पाटील यांचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान सुरेश पाटील यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सायंकाळी या महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*