गाळेधारकांच्या वाहनाला अपघात

0
जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-गाळ्यांबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी औरंगाबाद येथे जात असतांना गाळेधारकांच्या वाहनाला समोरुन येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात कारचालकासह चार जण गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जळगाव औरंगाबाद महामार्गावरील गाडेगाव घाटात सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपुष्टात आली आहे. गाळे ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिल्यानंतर प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली.

त्यामुळे गाळेधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. खंडपीठाच्या निकालावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी जळगावातील काही गाळेधारक औरंगाबादला वेगवेगळ्या वाहनाने जात होते.

दरम्यान गाडेगाव घाटात चारचाकी वाहन (क्र.एम.एच. 19 बीजे 7818) ला समोरुन येणार्‍या आयशर (क्र.एम.एच. 20 सीटी 2067) ने धडक दिली. त्यामुळे चारचाकी वाहन चक्काचुर होवून यातील गाळेधारक हितेंद्र शहा, फिरोज भिस्ती, आशुतोष शेट्टी आणि चालक अमोल मराठे जखमी झाले.

जखमींवर उपचार
औरंगाबादला जात असतांना दुसर्‍या वाहनात डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, संजय पाटील, दिलीप दहाड व वसिम काझी हे होते. दरम्यान त्यांना अपघाताची माहिती दिल्यानंतर ते माघारी आले आणि जखमींना जळगावातील खाजगी रुग्णालयात त्यांनी दाखल केले. दरम्यान जखमींवर उपचार सुरु आहेत.

कार चक्काचुर
गाडेगाव घाटात अपघात झाल्याने कार चक्काचुर झाली. तसेच कारमधील चौघेजण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर काहीवेळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

 

LEAVE A REPLY

*