आरोग्यदूत : थुंकीतून रक्त पडणे

0

पूर्वी ‘हमलोग’ ही लोकप्रिय टीव्ही सिरियल चालू असताना कोण्या पेशंटला जर लालसर रंगाची थुंकी आली, तरी त्याला आपणास क्षय झाल्याची भावना व्हायची, कारण त्या सिरीयलमधील एका नायकास तसे झाल्याचे दाखवले होते.

केवळ हिरडीमधून किरकोळ रक्त येण्यासारख्या साध्या कारणापासून फुफ्फुसाचा कर्करोग असण्यासारख्या गंभीर आजारातही प्रथम केवळ थुंकीतून रक्त पडणे एवढेच लक्षण असू शकते.

फरकाने फरक ओळखा

बर्‍याच वेळा रक्त थुंकीतून येते आहे का, उलटीतून येते आहे. यातील फरक रुग्णास सांगता येत नाही. खोकल्याची ढास येता येता उलटी होऊन त्यामध्येही रक्त पडू शकते.

अशावेळी पोटात दुखणे हे लक्षणही असू शकते. याउलट खोकल्यातून रक्त यत असल्यास पुढे 2-3 दिवसांपर्यंत बेडका पिंगट लालसर राहू शकतो. याशिवाय ताप असणे, दम लागणे ही लक्षणे फुफ्फुसाच्या आजाराकडे निर्देश करतात.

डॉ. विकास गोगटे
एम.बी.बी.एस.
मोबा. 9822118066

क्षयाची भावना व क्षय असल्याची भावना

केवळ गुलाबी पिंगट थुंकी येण्यापासून पूर्ण बेडका लालभडक रक्ताचा असण्यापर्यंत याची व्याप्ती असू शकते. रक्त काही थेंबापासून 1/2 कप इतपतही पडू शकते.

खोकल्याची ढास थांबल्यास रक्त पडणे थांबते. परत खोकला आल्यास पुन्हा चालू होऊ शकते. सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे थुंकीतून रक्त पडण्याचा संबंध, सामान्य माणूस त्याच्या माहितीनुसार क्षयरोग होण्याकडे लावत असतो.

परंतु श्वासमार्गाच्या, हृदयाच्या, रक्ताच्या काही आजारातही थुंकीतून रक्त येणे हे लक्षण दिसू शकते. क्षयाची भावना म्हणजे क्षयाची सुरुवात, पण क्षय असल्याची चुकीची भावना (गैरसमजूत) हीच जास्त प्रमाणात आढळून येते.

केवळ विश्रांती घेणे व खोकल्याची ढास कमी करणारे औषध घेणे याने खोकला कमी होऊन रक्त पडणे थांबू शकते. कोरडा खोकला थांबण्यासाठी तोंडात खडीसाखर, लेमन ड्रॉप्स, ज्येष्ठमध चघळणे उपयोगी पडते.

कोडोपायरीन ही डॉक्टरी सल्ल्याशिवाय उपलब्ध असणारी वेदनाशामक गोळी देखील उपयोगी ठरते. त्यातील अफूसारख्या द्रव्याने खोकला कमी होण्यास व पर्यायाने रक्त थांबण्यास मदत होते. ही 1-1 गोळी 3 वेळा या प्रमाणात घ्यावी.

थुंकीतून रक्त पडण्यामागे काही गंभीर कारणेही संभवत असल्यामुळे डॉक्टरी सल्ला आयुर्विम्याइतकाच आवश्यक ठरतो.

शेवटी थोडी गंमत

एक विसरभोळे प्राध्यापक दोन्ही कानांना भाजण्याच्या जखमा झाल्यामुळे डॉक्टरांकडे जातात.

डॉक्टर विचारतात, ‘काय हो काय झालं?’

प्राध्यापक म्हणतात, ‘काही नाही, मी शर्टला इस्त्री करत होतो, तेवढ्यात फोन वाजला अन्…’

‘अहो; पण दुसर्‍या कानाचे काय?’

‘पहिला कान भाजला म्हणून तुमची अपॉईंटमेंट घ्यावी म्हणून फोन कानाशी लावायला गेला अन्…’

LEAVE A REPLY

*