आरोग्यदूत : हायपरटेन्सिव्ह रेटिनापॅथी

0
उच्च रक्तदाबाच्या आजारामुळे डोळ्याच्या आतील सूक्ष्म दृष्टीपटलावरील रक्तवाहिन्यात काही विशिष्ट बदल होत जातात. या स्थितीला ‘हायपरटेन्सीव्ह रेटिनापॅथी’ असे म्हणतात.
अशा अवस्थेत सर्वसाधारणपणे रुग्णाला कोणता त्रास नसतो, मात्र काही निवडक रुग्णांना आपली दृष्टी कमजोर झाल्याचे जाणवत राहते.

रोगनिदान- डोळ्याची सखोल तपासणी करीत असताना दृष्टी पटलातील रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या आहेत. तसेच सौम्य प्रमाणात रक्तस्त्राव, काही भागात सूज आढळणे.

काही ठिकाणी अपूर्ण रक्तपुरवठा होत आहे अशा गोष्टी आढळतात. दृष्टीतंतूस सूज आलेली आहे असे आढळताच रुग्णाचा रक्तदाब फारच वाढला आहे असे अनुमान निघते.

अशा परिस्थितीत रुग्णाला दवाखान्यात भरती करणे केव्हाही हितावह ठरते. रुग्णालयात आजाराची पूर्ण तपासणी होऊन कारणे शोधली जातात व उपचार सुरू करतात.

डॉ नारायण देवगावकर

नेत्र तपासणी कशी करतात
1) दृष्टीपटलाचे निरीक्षण- ऑफ्थॅलमोस्कोप नावाच्या यंत्राद्वारे दृष्टीपटलाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. दृष्टीपटलातील बदल अनेक प्रकारे आढळून येतात. लहान आकाराच्या लांबीच्या शुद्ध रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात. दृष्टीपटलावर कापूस पिंजल्यासारखे मऊ रेशमी ठिपके आढळतात. पिवळसर रंगाची रक्तातली चरबी जमा झाल्याचे लक्षात येते. दृष्टीतंतूला सूज आल्याचे लक्षात येते. या परिस्थितीत रक्तदाब खाली आणणे महत्त्वाचे ठरते. दृष्टीला धोका असेल तर दृष्टीपटलावर निवडक उपचार केले जातात.

2) फ्ल्यूरसिन अँजिओग्राफी – या चाचणीद्वारे दृष्टीपटलातून अभिसरण होत असलेल्या रक्ताचा प्रवास अभ्यासता येतो. रुग्णाच्या शिरेतून फ्ल्यूरमिन नावाचे रंगद्रव्य टोचतात व विशिष्ट कॅमेर्‍याच्या मदतीने दृष्टीपटलाच्या रक्तवाहिन्यातून हे रंगद्रव्य कसे व किती प्रमाणात वाहते आहे याचे छायाचित्रण केले जाते व चित्रणांचा अभ्यास केला जातो.

3) ऑक्युलर ब्लड फ्लो अ‍ॅनॅलायझर- या चाचणीद्वारे डोळ्याच्या आतील दृष्टीपटलातील रक्त प्रवाहाची माहिती घेतली जाते. दृष्टीतंतूस रक्तपुरवठा होतो की नाही याची तपासणी केली जाते. रुग्णावर केलेले उपचार लागू पडताहेत की नाही यासाठी देखील या तपासणीची मदत होते. ज्या डोळ्यातील रक्तपुरवठा चांगला तो डोळा निरोगी असा निष्कर्ष निघतो. नॉर्मल स्थितीपेक्षा कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत आहे असे लक्षात येताच त्या डोळ्यांना दृष्टी गमावण्याचा धोका आहे, असे अनुमान निघू शकते व त्यानुसार उपाययोजना सुरू केल्या जातात. या यंत्राद्वारे वापरलेल्या औषधांचा सुपरिणाम दिसून येतो की नाही हे ही कळते.

 

 

LEAVE A REPLY

*