आरोग्यदूत : अंथरुणात लघवी होणे

0

एक वर्षाचे मूल चालू लागते व दुसर्‍या वर्षाला बोलू लागते. हा सर्वसाधारण नियम आहे; पण यालाही अपवाद असतात. काही मुले त्याहून उशिरा चालू-बोलू लागतात.

त्याचप्रमाणे मुलांच्या वाढीत त्यांच्या वयाच्या सुमारे 3 वर्षांपर्यंत त्यांच्या लघवी करण्याच्या क्रियेवर ताबा येतो. परंतु काही मुलांमध्ये (क्वचित मुलींमध्येही) असा ताबा येण्यास वयाची 5-6 वर्षे पूर्ण व्हावी लागतात.

डॉ. विकास गोगटे
एम.बी.बी.एस.
मोबा. 9822118066

जसा पालक तसा लेक
याचे कारण लघवी साठणार्‍या ब्लॅडरच्या स्नायूंना शक्ती (टोन) येण्याला वेळ लागणे हे असते. असेच लक्षण पूर्वी त्या मुलाच्या वडिलांमध्ये त्यांच्या लहानपणी असण्याची शक्यता असते.

वयाच्या 6 वर्षानंतरही जर लघवीवर ताबा आला नाही व अंथरुणात लघवी होत असेल, तर लघवीच्या मार्गातील जंतुदोष, मूत्राशयाचा आकार लहान असणे काही अंतस्त्रावी ग्रंथींचे आजार इत्यादी कारणे संभवतात.

काही वेळा मोठ्या माणसांमध्येही उशिराने हे लक्षण निर्माण होऊ शकते. लघवीची तपासणी व साधी शारीरिक तपासणी यांनी वरील कारणांचे निराकरण करता येते. काही वेळा तपासणीमध्ये काहीही दोष आढळत नाही.

अशावेळी त्याचे मानसिक अस्वास्थ्य हे कारण असू शकते. शाळा बदलली, राहायची जागा बदलली तरी नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याच्या मानसिक ताणामुळेही क्वचित असे घडते.

गजर करतो बझर : हेच वय असते. मुलाला घड्याळ शिकवायचे. ते शिकवताना त्याचबरोबर घड्याळाचा बझर कसा वाजतो हेही शिकवा. रात्री ज्या वेळी त्याचे अंथरूण ओले होते. त्या वेळेआधी अर्धा तास गजर लावून उठून लघवीला जून येण्याचे ट्रेनिंग द्या.
काळजी घ्या जरा : अंथरुणात लघवी होणार्‍या मुलाला संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून पाणी वा तत्सम पातळ पदार्थ कमी प्रमाणात द्यावेत.

याचाही अभ्यास : केवळ अंकलिपिचा अभ्यास न करता लघवीवर ताबा आणण्याचा अभ्यासही शिकवावा. त्यासाठी मुलास दिवसा मुद्दाम पाणी प्यावयास लावून लघवी लागल्यावर जरा वेळ तशीच रोखून धरण्यास सांगावे. असे रोखण्याने मूत्राशयाला लघवी क्रियेवर ताबा आणण्याचे एक प्रकारचे ट्रेनिंग मिळते. लघवी रोखून धरण्याचा हा काळ हळूहळू वाढवावा.

उपचार पालकांवरही
पालकांनी आपल्या मुलाबाबत धीर धरावा. अशा मुलांना स्वत:चा खास दोष नसतो. त्यामुळे त्याला रागवणे, शिक्षा करणे, दुसर्‍याच्या देखत त्या दोषांचा उल्लेख करणे असे केल्याने रोग अधिक बळावण्याची शक्यता असते. म्हणून असे करणे टाळावे.

मुलांच्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधावे, घरात वा शाळेत होणारी दादागिरी याचाही असा परिणाम होऊ शकतो.
वरील उपचारांनी फरक न पडल्यावर डॉक्टर काही औषधे 2-3 महिन्यांपर्यंत देतील त्याने फायदा होतो.

शेवटी थोडी गंमत

 दुसरीत असलेला चक्रम बाळू बाईंकडे गेला व म्हणाला, “बाई मला खूप जोराची शू लागली आहे.” त्यावर बाई रागावून म्हणाल्या, “असे बोलू नये. तुला जावेसे वाटेल तेव्हा फक्त करंगळी वर करायची.” त्यावर निरागस बाळूने शांतपणे विचारले, “तसे केल्याने जावे लागणार नाही का?”

LEAVE A REPLY

*