आरोग्यदूत : स्त्रियांचे मूत्र विकार

0

रजोनिवृत्तीनंतर शरीरामधील एस्ट्रोजन नावाचे हार्मोन कमी होत जाते. ह्याचा परिणाम योनी, मूत्राशय, मूत्रमार्ग आणि तिथल्या स्नायूंवर होतो. जसे वय वाढते तसे ह्या अवयवांची ताकद आणि आर्द्रता कमी होत जाते.

शुश्कतेमुळे दाह होणे, जळजळ होणे, लघवीला आग होणे, लघवी लवकर होणे व घाई होणे असे सगळे प्रकार घडू लागतात. पूर्वी प्रसूतीच्या वेळी आंतर स्नायूंना इजा झाली असल्यास रजोनिवृत्तीच्या वेळी लघवी गळणे हा प्रकार सुरू होतो.

कधी नुसती लघवी नाही तर संडास आणि गॅसवरचेही नियंत्रण कमी होते. ह्यामुळे स्त्री घराबाहेर जाणे टाळते आणि मित्र-मैत्रिणींपासूनही दूर होते. अति गरम वाटणे आणि घाम आल्याने रात्रीची झोप अपुरी होते आणि कधी कधी लघवी करायला वारंवार रात्री उठायला लागते.

मग दिवसा झोप येते, एकाग्रता कमी होते आणि कामावरचे लक्ष कमी होते. नकळत चुका होतात मग चिडचिड आणि राग येणे स्वाभाविक आहे. कधी तर लघवीच्या त्रासामुळे पतीशी जवळीक कमी होते आणि संभोग टाळला जातो.

ह्यामुळे सुद्धा दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि स्त्रीला नैराश्य येते. पण ह्या समस्या समजून घेणारे कमी लोक असतात आणि डॉक्टरांकडे काय सांगायचे हा प्रश्न खूप मोठा असतो. लाज वाटते-ते काय म्हणतील ह्याची शंका कायम सतावते आणि ती स्त्री डॉक्टरांकडे जाणे टाळते.

ह्या त्रासाची संपूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे. ते सहन करणे जरी स्त्रियांची सवय असली तरी आज ह्यावर उपचार आहेत आणि हा त्रास बरा होऊ शकतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. डॉक्टर तुमच्या त्रासाचा सविस्तर इतिहास घेतात आणि त्यावर निदानासाठी लागणार्‍या तपासण्या सांगतात.

डॉ नेहा लाड
डॉ नितीन लाड

तुम्ही दिवसातून किती पाणी पिता आणि किती वेळा लघवीला जाता आणि लघवी गळते का ह्याचा तख्ता ठेवायला सांगतात. हा तख्ता कमीत कमी 24 तासांसाठी ठेवावा.

पेय पदार्थावर नियंत्रण ठेवणे, अंतर स्नायूंचे नियमित व्यायाम करणे आणि उपयुक्त औषधे देऊन ह्यावर उपचार करता येतो. योनीमार्गातून दिलेले एस्त्रोजेन क्रीम उपयोगी पडते.

वारंवार होणार्‍या मूत्र संक्रमणावर ह्याचा चांगला परिणाम होतो. बर्‍याच वेळी शस्त्रक्रियेच्या आधी हे क्रीम वापरल्यास सुविधा होते.

मूत्राशय, मूूत्रमार्ग आणि अंतर स्नायूंची विशेष सोनोग्राफी करता येते. ह्यावरून शस्त्रक्रिया किती उपयोगाची ठरेल. ह्याचे निदान करता येते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे लघवी गळणे थांबवण्यात येते.

दुर्बिणीद्वारासुद्धा काही शस्त्रक्रिया केल्या जातात. जर आतले अंग बाहेर येत असेल तर संपूर्ण तपासणी करून शस्त्रक्रियेने त्याचे उपचार केले जाते.

लक्षात घ्या की लघवी संबंधित तक्रारींवर उपचार आहेत आणि त्यासाठी खूप वेळ किंवा खर्चही करावा लागत नाही. काही सोप्या उपायांमुळे ह्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते आणि आयुष्य सुधारू शकते.

 

LEAVE A REPLY

*