मू.जे. महाविद्यालयाचे देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान

0

जळगाव । मू.जे. महाविद्यालयाने खान्देशाच्या नव्हे तर देशाच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान दिल्याचे सांगत स्वायत्तत्तेनंतर विकासाची अधिक गती येईल अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केली. अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जीवनचरित्रावरील चंद्रकांत भंडारी लिखित ‘आनंदयात्री’ या स्मृतिग्रंथासह आठवणींची ह्रद्द पाने या शशिकांत वडोदकर आणि चंद्रकांत भंडारी यांनी संपादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

आनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आनंदघनस्मृती या संगीत कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी मू.जे.महाविद्यालयातील विवेकानंद भवनाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, केसीई संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, प्रख्यात गायक राहुल देशपांडे, छबिलभाई शहा, दलूभाऊ जैन, डॉ.अरुणा पाटील उपस्थित होते.

वैचारिक दिशा ठेवावी
कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी केसीई संस्थेचे कौतुक करीत डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या विचारांना पुढे नेणारी वैचारिक दिशा संस्थेच्या प्रत्येक घटकाने ठेवावी असे आवाहन केले. यावेळी मू.जे.महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करावी असा प्रस्ताव प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांचेकडे सुपूर्द केला.

काही प्रवृत्तींमुळे केसीईला मेडिकल कॉलेज मिळु शकले नाही- आ.खडसे
अरूणभाई गुजराथी आणि मी एका स्टेजवर असताना ते अगोदर बोलले तर आपण नंतर काय बोलावे हा प्रश्न असतो. पण राजकिय भाषणात मी वरचढ असतो. मात्र साहित्यातील भाषणात अरूणभाई नेहमीच वरचढ असतात, कारण त्यात वापरलेले शब्द हे खुप मोठे असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. तसेच काही व्यक्तीच अनेक पिढ्यांपर्यंत आपले जीवनचरित्र घेवून जातात, त्यापैकी डॉ. अण्णासाहेब बेंडाळे होते. केसीईला मेडिकल कॉलेज मिळावे अशी त्यांची इच्छा होती. 1995 मध्ये मंत्रीमंडळात तसा प्रस्ताव मान्य झाला होता. पण जिल्ह्यातील काही प्रवृत्तीमुळे केसीईला मेडिकल कॉलेज मिळू शकले नसल्याचे खडसे यांनी सांगितले.

स्व.अण्णासाहेब बेंडाळेंनी कर्मयोग जपला- गुजराथी
अरूणभाई गुजराथी म्हणाले, की डॉक्टरांमध्ये आता स्पेशलायझेशन आले आहे. पण अण्णासाहेब बेंडाळे हे सर्वच कामात पारंगत होते. त्यांच्यातील कर्मयोग हा घेण्यासारखा असून, ते कधी नशीब- नशीब न करता कर्मयोग जपला असल्याचे ते म्हणाले.

प्रस्तावनेत केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी सांगितले माझे पिता डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या प्रेरणेने मी खंबीरपणे उभा आहे. मी त्यांच्या वैभवशाली पितृछत्रछायेत जन्मलो व वाढलो. डॉ. बेंडाळे यांना शास्त्रीय संगीत, नाट्य, शिल्पकला अशा सर्जनशील ललित कलांची आवड होती. म्हणून आजचा आनंदघनस्मृती हा कार्यक्रम आहे. केसीई संस्था थिंक ग्लोबली, ऐक्ट लोकली अशी मूल्यात्मक प्रगतीची आकाशाला गवसणारी व जमिनीशी घट्ट नाते जुळविणारी विचारसरणी पुढील काळात अंगीकारत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी आ.शिरीष चौधरी, माजी प्राचार्य अनिल राव, खा.रक्षा खडसे, जीवनताई झोपे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री भलवतकर यांनी तर आभार डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी मानले. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी यानंतर सुगम संगीत, शास्त्रीय गायन आणि सुश्राव्य भक्ती गीते सादर केलीत.

LEAVE A REPLY

*