जळगाव जिल्ह्यात दोन हजार 117 गणेश मंडळ

0

जळगाव । आराध्यदैवत गणरायाची उद्या दि.13 रोजी गणेश चतुदर्शीला जल्लोषात स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हात 2 हजार 117 गणेश मंडळांना पोलिस प्रशासनांकडून रितसर परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 113 गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनांकडून देण्यात आली.

जिल्ह्यात 1 हजार 486 सार्वजनिक गणेश मंडळ तर 518 खाजगी मंडळांची नोंद करण्यात आली आहे. भाविकांनी गणेशोत्सवाचे पावित्र राखुन उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन पोलिस प्रशासनांकडून करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात पोलिस प्रशासनांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. जिल्हयातील 113 गावांमध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने या उपक्रमाचे पोलिस अधिक्षकांनी कौतुक केले.

रात्री 12 वाजेपर्यंत वाजवा रे वाजवा
गणेशोत्सव काळात दि. 17, 19 व 23 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना परवानगी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर गणेश महामंडळांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणुकांना परवानगी द्यावी अशी मागणी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या संदर्भात आज परिपत्रक जारी केले.

यात दि. 17 रोजी पाचव्या दिवशी, दि. 19 रोजी सातव्या दिवशी व दि. 23 रोजी शेवटच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे जिल्ह्यातील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*