डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू

0
जळगाव । जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथील 6 वर्षीय चिमुकलीला टॉन्सील्सचा त्रास झाल्याने तिला जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. चिमुकलीला बरे वाटू लागल्याने तिला घरी पाठविण्यात आले होते. काल दि.11 रोजी पुन्हा चिमुकलीची प्रकृती खालावल्याने तिला रात्री त्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्या डॉक्टरांनी तिला घेण्यास नकार दिला.

त्यामुळे चिमुकलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना रात्रीच चिमुकलीचा मृत्यू झाला. दरम्यान खाजगी रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील आनंदा कोळी हे हमाली काम करतात. त्याची 6 वर्षीय चिमुकली शिवानी हिला टॉन्सील्सचा त्रास होत असल्याने दि.3 रोजी दुपारी डॉ.जगदीश बोरोले यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी 8 दिवस उपचार घेतल्यानंतर दि.10 रोजी चिमुकलीला बरे वाटू लागल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला होता.

परंतु रात्र जास्त झालेली असल्याने बस मिळणार नसल्याने तिचे कुटूंबीय रात्री हॉस्पिटलाच थांबले. रात्रभर हॉस्पिटलला थांबण्याचे 500 रूपये व इतर दिवसांचे जवळपास 20 हजार रूपये रूग्णालयाचे बील आणि 15 हजार रूपये मेडीकलचे बील आनंदा कोळी यांनी भरले. हॉस्पीटलमध्ये असताना चिमुकलीबाबत काहीही विचारणा करण्यासाठी डॉक्टरांना भेटू दिले जात नसल्याचे तिचे मावस काका अनिल कोळी यांनी सांगितले.

डॉक्टर बोरोले हॉस्पिटलला न आल्याने जिल्हा रुग्णालयात हलविले
दि.10 घरी गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी दि.11 रोजी शिवानीची प्रकृती पुन्हा खालावल्याने तिचे वडील सायंकाळी 7 वाजता तिला डॉ.बोरोले यांच्याकडे घेवून आले. दरम्यान, त्याठिकाणी डॉक्टर नव्हते. हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांनी शिवानीला दाखल करून न घेता इतर खाजगी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात घेवून जाण्याचा सल्ला दिला. कोळी कुटूबिंयांनी डॉक्टरांशी संपर्क केला तरीही ते आले नाही. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचीप्रतिक्षा केली.

जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू
डॉ.बोरोले यांच्या रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे देखील पोहचले होते. दरम्यान डॉ.बोरोले न आल्याने शिवानीला जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. दिनेश खैताडे यांनी तिची तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

डॉक्टर बोरोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
टॉन्सील्स फुटल्याने शिवानीच्या शरीरात इन्फेक्शन झाले होते. डॉ.बोरोले यांनी योग्य उपचार न केल्याने त्याचे निदान होवू शकले नाही त्यामुळेच शिवानीचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शिवानीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

LEAVE A REPLY

*