जळगावात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा एल्गार

0

जळगाव । आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत यासह अन्य मागण्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि.11 रोजी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेतर्फे शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रवेशद्वारासमोर धरणे करण्यात करुन शासनाच्या भुमिकेविरोधात निदर्शन करण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद मागण्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाची मुदत दर पाच वर्षांनी न वाढविता या अभियानाचे कायमस्वरुपी योजनेत रुपांतर करुन अखंडपणे सुरु ठेवण्यात यावे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करण्यात यावे. वेतन व भत्ते लागू होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना 7 हजार तर गटप्रवर्तकांना 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे. दरमहा 1500 रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी सांगितले होते. परंतु या प्रस्तावाबाबत कारवाई झालेली नाही. कामाचा मोबदला दरमहा अदा करण्यात यावा. राज्यातील सर्व विभागात सायकली पुरविण्यात याव्या.

गणवेशासाठी दरवर्षी 1 हजार रुपये देण्यात यावे. मोबाईल खर्चात वाढ करावी. गटप्रवर्तकांना विनामुल्य लॅपटॉप पुरविण्यात यावे. आशा स्वयंसेविकांना प्रत्येक बाळंतपणासाठी सरसकट मोबदला देण्यात यावा. आरोग्य कीट देण्यात यावे. कामकाजासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात यावे. लिंक वर्कर्सना आशा वर्कर्स म्हणून वर्ग केल्यापासून त्यांना मिळणार्‍या सर्व मोबदल्याची थकबाकी त्वरीत अदा करावी.

आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील यांसह कल्पना भोई, उषा महाजन, आशा पाटील, जयश्री पाटील, भारती सपकाळे, अनिता कोल्हे, प्रिती चौधरी, भारती तायडे, माया बोरसे, रविशा मोरे, शितल सोनवणे, भागीरथी पाटील, ज्योती पाटील, सुनिता भोसले, आरती वंजारी, लता वाकचौरे, चंद्रकला पाटील, वंदना साळुंखे, वंदना पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*