Type to search

गुंतवणुकीच्या पर्यायांचा समतोल

ब्लॉग

गुंतवणुकीच्या पर्यायांचा समतोल

Share

आपला पैसा कसा वाढवावा हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु त्यासाठी तो योग्य प्रकारे गुंतवणे आवश्यक असते. गुंतवणुकीच्या सगळ्याच पर्यायांमध्ये पैसा गुंतवणे अनेकदा चुकीचे ठरते. त्यामुळे बाजारातील ट्रेंड, आपल्याकडे गुंतवण्यासाठी असलेली रक्कम आणि त्यातून मिळणारे परतावे तसेच कर वजावट या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक सुज्ञपणाची गुंतवणूक ठरते.

मिळवलेला पैसा कुठेही गुंतवला नाही तर लवकर संपून जातो. म्हणूनच तो शहाणपणाने गुंतवणे म्हणजे संपत्ती वाढवणे होय. बँकांचे घसरते व्याजदर आणि त्यांचा कर्जबाजारीपणा या बाबींचा विचार करता बँकांमधील मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याकडे अलीकडे अनेकांचा कल नाही. ज्यांनी आधी पैसे गुंतवले होते ते लोकही मोठ्याप्रमाणात इतर पर्यायांकडे वळले आहेत. साहजिकच आपण बचत केलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे, हेही एक कौशल्य आहे. कारण पैसा मिळवणे ही वेगळी गोष्ट आणि गुंतवणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळेच अनेकदा कमी पैसे कमावणारे लोक प्रौढ वयात अधिक वेतन असलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक श्रीमंत बनतात.

कारण त्यांनी योग्य नियोजनाद्वारे योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक केलेली असते. यासाठीच आपला पैसा कसा वाढत चालला आहे आणि विविध घटक त्यात कशी भर टाकत आहेत याचा सातत्याने मागोवा घेणे आवश्यक असते. यादृष्टीने योग्य स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक जन्माची ददात मिटवून टाकू शकते. मात्र अनिश्चितपणा लक्षात घेता स्टॉक मार्केटमध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक केली जाते. वास्तविक पाहता आपल्या गुंतवणुकीच्या रकमेचे योग्य विभाजन करणे अत्यावश्यक असते. घराच्या हप्त्यासाठी किंवा घरातल्या गुंतवणुकीत बचतीच्या मासिक रकमेपैकी 40 टक्के रक्कम खर्ची पडली असे गृहीत धरले तर 30 टक्के रक्क प्रॉव्हिडंट फंडात टाकली पाहिजे. याखेरीज बँकेतील बचत आणि मुदत ठेवी यांच्यामध्ये 10 टक्के रक्कम ठेवण्यास हरकत नाही. यात या ठेवींच्या निश्चित दरामुळे सुरक्षितपणाचा विचार केला जातो. 10 टक्के रक्कम ही रत्ने, सोने व दागिने यांच्यामध्ये गुंतवावी. उर्वरित 10 टक्क्यांपैकी 5 टक्के रक्कम विमा उत्पादनांमध्ये आणि 5 टक्के रक्कम शेअर बाजारात स्टॉक्समध्ये गुंतवावी. अशा पद्धतीने केलेली गुंतवणूक लाभदायक ठरते, असा सल्ला या क्षेत्रातील जाणकार देतात.

अनेकदा घेतलेला स्टॉक उत्तम ठरला तर सर्वसामान्यपणे 5-6 वर्षांमध्येच तुमच्या एकूण संपत्तीतील सुमारे एक टक्का एवढा वाटा त्या एकट्या स्टॉकचाच असू शकतो. अर्थातच यासाठी स्टॉकची निवड जितकी महत्त्वाची तितकेच तुम्ही कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीत किती कालावधीसाठी गुंतवणूक करता हे महत्त्वाचे असते. प्रत्यक्ष म्युच्युअल फंड आणि स्टॉक यांच्या कंपन्यांच्या नावांपेक्षाही कालावधी अनेकदा अधिक महत्त्वाचा ठरतो. जोखीम, परतावा आणि तरलता या तिन्ही गोष्टींचा विचार करून केलेली गुंतवणूक चांगली ठरते. या तिन्ही घटकांचा विचार करून आपले गुंतवणुकीचे पर्याय कसे आहेत याचा आधीच आढावा घेऊन गुंतवणूक केली पाहिजे. गेल्या वर्षभरासाठी त्यांनी किती परतावे दिले हे पाहिले तरी आपण कशी गुंतवणूक करावी, याचे चित्र स्पष्ट होते. मालमत्ता, पीएफ, पीपीएफ आणि टपाल खाते, बँकांमधील ठेवी, विमा आणि म्युच्युअल फंड, दागदागिने आणि इक्विटी शेअर असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत.

या प्रत्येकाची किंमत कशी बदलते आणि आपण त्यात किती आणि केव्हा गुंतवणूक करतो यावर हे पर्याय आपल्या संपत्तीत कशी भर टाकतात ते अवलंबून असते. म्हणूनच कुठे आणि किती गुंतवणूक करावी याचा तारतम्याने घेतलेला निर्णय हा आपल्या संपत्तीच्या व्यवस्थापनातला महत्त्वाचा मुद्दा असतो. आपल्या इच्छेनुसार या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याच्या वर दिलेल्या आदर्श प्रमाणात आपण कमी-जास्त बदल करू शकतो. यासंदर्भात गेल्यावर्षी विविध पर्यायांच्या किमतीत झालेला बदल विचारात घेतला तर आपल्याला असे दिसते की घर, जमीन इत्यादी मालमत्तेत केलेेल्या 40 टक्के गुंतवणुकीतून सुमारे 12 टक्क्यांनी परतावा मिळाला. पीएफ, पीपीएफ आणि पोस्टातील गुंतवणुकीतून 8 टक्क्यांनी, बँकांच्या मुदत ठेवींतून 6 टक्क्यांनी, विमा आणि म्युच्युअल फंडांतून 8 टक्क्यांनी, दागदागिन्यांमधून 4 टक्क्यांनी आणि इक्विटी शेअर्समधून 15 टक्क्यांनी परतावा मिळाला. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मालमत्ता वगळता या सर्व पर्यायांमध्ये अनुक्रमे 30, 10, 5, 10 आणि 5 अशा टक्केवारींमध्ये गुंतवणूक केली गेली तर त्यामुळे आपल्याला 4.80, 2.40, 0.60, 0.40, 0.40 आणि 0.75 टक्के एवढा या पर्यायांचा संपत्तीच्या वाढीतील सहभाग असल्याचे दिसते. एकूण सहभाग हा 9.35 टक्के असेल.

मात्र आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन या पर्यायांमधला हिस्सा वाढवला किंवा कमी केला तर हा सहभाग आपण वाढवू शकतो. अर्थातच बदल करताना फक्त या मालमत्तांच्या किंमतींचाच विचार केला तर निर्णय चुकू शकेल. त्याच्या जोडीला त्यांच्यामध्ये असलेली जोखीम आणि तरलता या घटकांचा विचारही करावा लागेल आणि हा विचार अधिक अवघड असतो. यासाठी गरज पडली तर तज्ञांची मदत जरूर घ्यावी. संबंधित पर्यायांच्या आधीच्या काही वर्षांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा. स्वतःचा अभ्यास आणि गरजेनुसार सल्ला याद्वारे संपत्तीतच चांगली भर टाकता येते. म्हणूनच विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा व्यूहरचनात्मक असतो. आपले गुंतवणुकीचे पर्याय कशा प्रकारे काम करतील आणि ते परस्परांना पूरक ठरून अधिक वाढ कशी मिळवून देतील याचा अंदाज गुंतवणूकदाराकडे किंवा त्याच्या सल्लागाराकडे असला पाहिजे.

या पार्श्वभूमीवर गुंतवणूक करण्याआधी गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करा. किती परतावा अपेक्षित आहे याचा विचार करा. जोखीम घेण्याचा तुमचा प्राधान्यक्रम, तरलतेची तुम्हाला भासणारी गरज या गोष्टींचा पूर्ण विचार करा. आपल्या संपत्तीचा किती वाटा तुम्ही या पर्यायांमध्ये टाकता यापेक्षा कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करता किंवा कोणत्या बँकेच्या कोणत्या योजनेत तुम्ही गुंतवणूक करता याला अधिक महत्त्व नसते, हे मनात स्पष्ट असू द्या. आपल्या बचतीचे तुम्ही करत असलेले विभाजन आणि किती प्रमाणात तुम्ही ती या पर्यायांमध्ये गुंतवता याला अधिक महत्त्व द्या. या प्रत्येक गुंतवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवा आणि त्यांची कामगिरी कशी होत आहे, त्याचा सर्व प्रकारांनी वेध घेत राहा. त्यानुसार प्रत्येक गुंतवणूक पर्यायातील गुंतवणुकीच्या प्रमाणात योग्यवेळी बदल करत राहा. संपत्ती वाढणे या महत्त्वाच्या गोष्टीवरच अवलंबून असते, हे कायमच लक्षात ठेवा. तुम्ही निवृत्तीसाठी पैसा गुंतवता की मुलांच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी हे हेतू गौण असतात. गुंतवलेला पैसा योग्य प्रकारे वाढत आहे की नाही याला अधिक महत्त्व असते. कारण तुमच्या गरजांसाठी लागणार्‍या पैशाहून अधिक पैसा आला तर त्यामुळे तुमचा फायदाच होणार असतो. तो इतरत्र वळवून तुम्ही आणखी संपत्तीची निर्मिती करू शकता.
– महेश देशपांडे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!