परिवहन मंडळाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍यास पोलीस सांगून 32 हजारात गंडविले

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-परिवहन मंडळाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍यास पोलिस सांगून त्याच्या हातातील 32 हजार रुपये किंमतीच्या दोन सोनाच्या अंगठया पिशवीत ठेवण्याचे सांगत गंडविल्याची घटना आज सकाळी 10.45 वाजेच्या सागरपार्क ते आकाशवाणी चौक रस्त्यावर घडली. दरम्यान याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर पार्क परिसरातील रहिवाशी परिवहन मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी भगवान लोटन पाटील हे सकाळी 10 वाजेच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या डॉ. माधुरी पाटील यांच्या सरस्वती हॉस्पिटल येथे दातांच्या उपचारासाठी गेले होते.

उपचार करुन पाटील हे सागरपार्ककडून आकाशवाणी चौकाकडे जात असतांना सागरपार्क जवळ मागून काळया रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या एका 30 ते 35 वर्षीय तरुणाने पोलिस असल्याचे सांगितले.

त्यावेळी पुन्हा एक तरुण मोटारसायकलवर त्याठिकाणी आला. त्या तरुणाच्या गळयात सोन्याची चैन होती. यावेळी पोलिस सांगणार्‍या तरुणाने त्या तरुणाला गळयातील चैन रुमालात बांधून खिश्यात ठेवण्यास सांगितले.

यावेळी पोलिस सांगणार्‍या तरुणाने पाटील यांना सागरपार्कवर रात्री मोठा राडा झाला होता. माझी या ठिकाणी डयुटी आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठया काढून घ्या, माझ्याकडे द्या, मी रुमालात बांधून तुमच्याकडे देतो, पुढे साहेब उभे आहे.

त्यामुळे घरी गेल्यावर अंगठया घाला असे सांगून त्या तरुणाने अंगठया रुमालात बांधून पाटील यांच्या पिशवीत टाकल्या. व दोन्ही तरुण मोटारसायकलीने हॉटेल रॉयल पॅलेसच्या दिशेने गेले.

काही वेळात पाटील यांनी कॅरीबॅगमधील रुमाल उघडून अंगठया आहेत का? याबाबत खात्री केली असता, रुमालात अंगठया न दिसून आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलिसात येवून घटनेची माहिती दिली.

जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु घटनास्थळ रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पोलिसांनी भगवान पाटील यांना रामनंद नगर पोलिसात तक्रार देण्यास सांगितले.

दरम्यान पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात दोन भामटयांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*