मनपा समंजसपणा दाखविल?

0
‘नाशिक मनपाच्या सेवेत सामावून घ्यावे, अन्यथा येत्या 15 ऑगस्टला जलसमाधी घेऊ’ असा इशारा 36 कश्यपी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यावर परवा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसोबतच राज्यमंत्री भुसे, जलसंपदाचे अधिकारी तसेच मनपा अधिकारी हजर होते.

या बैठकीत मनपा अधिकार्‍यांनी वेगळीच भूमिका घेतली. नाशिकला कश्यपी धरणाचा उपयोगच नाही, असे सांगून ‘धरणही नको आणि पाणीही’ असा पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्तांना मनपा सेवेत सामावून घेण्यास असर्थता दर्शवली. मनपा अधिकार्‍यांच्या या पवित्र्याने जिल्हाधिकार्‍यांनाही नवल वाटले.

जिल्हाधिकार्‍यांनी मनधरणी केल्यावर प्रकल्पग्रस्तांनी नियोजित आंदोलन मागे घेतले. याउलट मनपा अधिकारी मात्र असमर्थनीय कारणे सांगत आहेत. कश्यपी हे गंगापूर समुहातील धरण आहे. त्यातून नाशिक मनपासाठीही काही पाण्याचे आरक्षण आहे. धरण बांधताना त्या पाण्याचा उपयोग नाशिकला होईल, या हेतूने मनपानेही सहभाग घेतला. बरीच रक्कमही खर्च केली. तो इतिहास लक्षात घेता प्रकल्पग्रस्तांना त्यावेळी दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवणे योग्य नाही. मनपा ही एक जबाबदार संस्था आहे. तिच्याकडून समंजस भूमिका अपेक्षित आहे.

मनपा अस्थापनेवर 35 टक्के खर्च होतो. त्यामुळे आणखी नोकरभरती शक्य नाही, असे मनपा अधिकार्‍यांनी सांगितले. मनपातील रिक्त पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरावीत, असा मध्यम पर्याय जिल्हाधिकार्‍यांनी सुचवला. रिक्त पदांवर प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करू, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सुचवले. नाशिक महानगर वेगाने विस्तारत आहे.

त्यामुळे येथील वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आव्हान नाशिक मनपापुढे आहे. दूरदृष्टीने भविष्यातील नियोजन करणे आवश्यक आहे. त्या दिशेने मनपाकडून काही प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत काही प्रकल्प हाती घेतले गेले आहेत. तथापि पुढील अर्धशतकातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी कसे उपलब्ध करता येईल, याचाही विचार गांभीर्याने व्हायला हवा. तसा तो होत आहे का?

जिल्हाधिकार्‍यांनी सुचवलेला पर्याय मनपाने स्वीकारल्यास प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला नोकरीचा प्रश्न सुटू शकेल. प्रकल्पग्रस्तांनी जशी समंजसपणाची भूमिका घेतली तशी अपेक्षा मनपा प्रशासनाकडून करणे अयोग्य वाटू नये.

LEAVE A REPLY

*