हैदराबादचा कोलकत्यावर विजय

0
कोलकाता । अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर 13 धावांनी मात केली. आजच्या विजयासह हैदराबादने आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रविवारी मुंबई येथे चेन्नई विरूध्द हैदराबादची अंतिम लढत होईल. राशिद खानची अष्टपैलू कामगिरी आणि अखेरच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटचा प्रभावी मारा या जोरावर हैदराबादने अकराव्या हंगमाच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं.

हैदराबादने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर ख्रिस लिन आणि सुनिल नरीनने फटकेबाजी करत हैदराबादच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. मात्र, सुनिल नरीन माघारी परतल्यानंतर कोलकात्याचे इतर फलंदाज प्रभावी खेळ करु शकले नाहीत. त्यातच राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात कोलकात्याचे फलंदाज पटापट अडकत गेल्यामुळे महत्वाच्या षटकात सामन्याचं पारडं हैदराबादच्या बाजूने झुकलं. अखेरच्या षटकांमध्ये पियुष चावला, शुभमन गिल आणि शिवम मवी यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.

हैदराबादकडून राशिद खानने 4 षटकात 19 धावा देत 3 गडी बाद केले. त्याला कार्लोस ब्रेथवेट आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी 2-2 तर शाकिब अल हसनने 1 बळी घेत चांगली साथ दिली. कोलकात्याकडून सलामीवीर ख्रिस लीनने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही.

त्याआधी अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात 174 धावांपर्यंत मजल मारली. अंतिम फेरी गाठण्यासाठी कोलकात्याला 175 धावांचं आव्हान देण्यात आले होते.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये, हैदराबादच्या फलंदाजांना चांगलचं जखडवून ठेवलं. शिखर धवन-वृद्धीमान सहा जोडी माघारी परतल्यानंतर हैदराबादचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. एका पाठोपाठ बळी बाद होण्याचं सत्र सुरुच असल्यामुळे कोलकात्याने सामन्यावर आपली पकड मजबूत केल्याचे चित्र निर्माण झाले होते. हैदराबादचा हक्काचा स्फोटक फलंदाज कार्लोस ब्रेथवेटनेही आजच्या सामन्यात निराशा केल्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली.

मात्र, राशिद खानने अखेरच्या षटकांमध्ये दाणपट्ट्याप्रमाणे बॅट चालवत कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. भुवनेश्वर कुमारसोबत केलेल्या छोटेखानी भागीदारीच्या साथीने राशिद खानने हैदराबादला 20 षटकांमध्ये 174 धावांचा पल्ला गाठून दिला. कोलकात्याकडून कुलदीप यादवने सर्वाधीक 2 बळी घेतले. त्याला शिवम मवी, पियुष चावला आणि सुनिल नरीनने प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली. आयपीएलच्या 11 व्या हंगामाच्या विजेतेपदासाठी अंतिम सामना चेन्नई विरूध्द हैदराबाद असा होईल. रविवारी मुंबईत ही लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

*