जळगावात मनपात भाजपाची कसोटी

0
जळगाव । महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षाने आप-आपले जाहीरनामे प्रसिध्द करुन विकास कामे करण्याबाबत आश्वासन दिले. निवडणुकीत भाजपला जळगावकरांनी कौल देवून एकहाती सत्ता दिली.

त्यामुळे आश्वासनपुर्ती करणे बंधनकारक आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार दरवर्षी प्रगती अहवाल सादर न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत आता आश्वासनपुर्तीसाठी भाजपसमोर कसोटी लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकही जागेवर निवडणूक न लढविणार्‍या व जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणार्‍या राजकीय पक्षांची नोंदणी देखील रद्द करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 2004 पासून राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश 2009’ हा अस्तित्वात आहे.

या आदेशात सुधारणा केल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाने आयोगाच्या 25 जुलै 2018 च्या सुधारीत आदेशानुसार पुढील पाच वर्षात किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमीत कमी एका जागेवर निवडणूक लढविणे आवश्यक असेल. अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल. संबंधित राजकीय पक्ष, उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेता प्रत्यक्ष निवडणूक लढविणे बंधनकारक असेल.

राजकीय पक्षांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची एक अधिकृत प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍याकडे सादर करावी लागेल. महानगरपालिकेच्या बाबतीत संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे; तर नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍याकडे ही प्रत द्यावी लागेल.

संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करणार्‍या किंवा सत्तेत सहभागी असलेल्या पक्षास जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेचा वार्षिक अहवाल मतदारांच्या माहितीसाठी जाहिरातीद्वारे अथवा संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. त्याची प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍याकडे देणेदेखील बंधनकारक असेल. सलग दोन वर्षे आश्वासन पूर्ततेचा वार्षिक अहवाल सादर न करणार्‍या राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली जाणार आहे.

वर्षभरात विकासाचे भाजपचे आश्वासन
महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने येत्या वर्षभरात विकास करुन शहराचा कायापालट करणार असे आश्वासन मतदारांना दिले आहे. महानगरपालिकेकडे असलेले हुडकोचे कर्ज मुक्त करणार, गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावणार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बे-घरांना मालकी हक्काने घर उपलब्ध करुन देणार, अमृत योजनेचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना 24/7 पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणार,

नवीन रस्ते तयार करुन शहर खड्डेमुक्त करणार, समांतर रस्त्याचे काम पुर्ण करणार, उद्योग नगरीच्या प्रश्नाला गती देणार, फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावणार, उड्डाण पुलाची निर्मिती करणार, उद्याने व मेहरुण तलावाचा विकास करणार अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भाजपने जाहीरनामा प्रसिध्द करुन आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता आश्वासनपुर्ती बंधनकारक असून दरवर्षी विकास कामांच्या प्रगतीचा अहवाल द्यावा लागणार असल्याने भाजप समोर मोठे आव्हान ठाकले आहे.

LEAVE A REPLY

*