सुरेशदादांच्या वर्चस्वाला सुरुंग : ‘कमळ’ फुलले

0
जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर मुसंडी मारुन भाजपाने एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेला केवळ 15 जागा मिळविता आल्या आहेत.

एमआयएमने 3 जागांवर विजय मिळविला असून प्रथमच महापालिकेत एन्ट्री झाली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी-सपा आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. भाजपाने राज्यातील विजयाची परंपरा कायम ठेवून जळगाव महानगरपालिकेवरही निर्विवादपणे विजयश्री खेचून आणली आहे.

जळगाव महानगरपालिकेत 19 प्रभागातील 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत वरिष्ठ नेत्यांनी संकेत दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाली. परंतु स्थानिकपातळीवर चर्चा न झाल्याने तसेच युतीला भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोध असल्यामुळे अखेर युती फिस्कटली आणि शिवसेना व भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविली.

भाजपकडून जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन तर शिवसेनेचे माजी आ.सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. जामनेर नगरपालिकेनंतर ना.महाजन यांनी जळगाव मनपाकडे लक्ष केंद्रीत केले होते. शहराच्या विकासासाठी सत्ता द्या, असे त्यांनी केलेल्या आवाहनाला जळगावकरांनी प्रतिसाद देवून भाजपाला स्पष्ट बहुमत दिले असून ना.महाजनांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

शिवसेनेला मानावे लागले 15 जागांवर समाधान
शिवसेना नेते माजी आ.सुरेशदादा जैन प्रणित खान्देश विकास आघाडीची आतापर्यंत महापालिकेवर सत्ता राहिली आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे सांगितले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत खाविआने 33 जागा मिळविल्या होत्या. परंतु या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर त्यांना 15 जागांवर समाधान मानावे लागले.

नवीन उमेदवार विजयी
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेल्या इनकमिंग उमेदवारांबरोबरच नवख्यांनाही संधी दिली गेली. यामध्ये भाजपाचे मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचे चिरंजीव सुनिल खडके, आ.राजुमामा भोळे यांचे शालक डॉ.विश्वनाथ खडके, माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे यांचे चिरंजीव अमित काळे हे विजयी झाले. त्याबरोबरच प्रिया जोहरे, सरिता नेरकर, अ‍ॅड.दिलीप पोकळे, रुख्सानाबी खान,

किशोर बाविस्कर, मिना सपकाळे, रंजना सपकाळे, प्रविण कोल्हे, चेतन सनकत, चेतना चौधरी, मुकुंदा सोनवणे, धिरज सोनवणे, सचिन पाटील, प्रतिभा पाटील, मयुर कापसे, हसीनाबी शेख, कुलभुषण पाटील, गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, सुरेखा सोनवणे, राजेंद्र पाटील, रजनी अत्तरदे, रेश्मा काळे, मनोज आहुजा, मिनाक्षी पाटील, रंजना सोनार तर शिवसेनेचे मनोज चौधरी, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे आणि एमआयएमचे रियाज बागवान, सुन्नाबी देशमुख, सैईदा शेख हे उमेदवार पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी-सपा आघाडी शून्यावर आऊट
महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-सपा यांनी आघाडी केली होती. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत 11 जागा जिंकल्या होत्या. परंतु यावेळी आघाडी करुनही एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. तर एमआयएमने 3 जागा मिळवून महानगरपालिकेत एन्ट्री केली आहे.

16 नगरसेवकांचा पराभव
महानगरपालिकेच्या निवडणुकीत विद्यमान 44 नगरसेवक रिंगणात होते. त्यापैकी 16 विद्यमान नगरसेवकांचा दारुण पराभव झाला. यामध्ये संगीता दांडेकर, सुनिल माळी, वर्षा खडके, जयश्री पाटील, दिपाली पाटील, अमर जैन, लता मोरे, मुख्तारबी पठाण, शामकांत सोनवणे, लिना पवार, रविंद्र पाटील, अश्विनी देशमुख, पृथ्वीराज सोनवणे, चेतन शिरसाळे, ममता कोल्हे, हेमलता नाईक हे विद्यमान नगरसेवक पराभूत झाले आहेत.

LEAVE A REPLY

*