जिल्ह्यात ‘आरोग्य यंत्रणा’ तोकडी

0
जळगाव । दि.31 ।-सन 2011 च्या जनगणनेनुसार 42 लाख 29 हजार 927 लोकसंख्या असलेल्या जळगाव जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह 17 ग्रामीण रुग्णालय, तीन उपजिल्हा रुग्णालय तर 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 442 उपकेंद्र आहेत.
प्रशासनातर्फे आरोग्य सेवेचा डांगोरा पिटला जात असला तरी आरोग्य यंत्रणा मात्र तोकडी दिसून येत आहे. जिल्ह्यात डॉक्टरांची तब्बल 151 पदे रिक्त असून प्रमुख पदांवर प्रभारी ‘राज’ सुरु आहे.

शासकीय रुग्णालयात उपचार घेणार्‍या गोरगरीब रुग्णांची ‘रुग्णालय म्हणजे मंदिर’ आणि ‘डॉक्टर म्हणजे देव’ अशी धारणा आहे.

परंतु पूरक आरोग्य यंत्रणे अभावी योग्य उपचार आणि निदान होत नसल्याचे बोलले जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांअभावी आरोग्य यंत्रणाच ‘सलाईनवर’ आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांची वर्ग 1 चे 37 तर वर्ग 2 चे 121 असे एकूण 158 पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ 67 डॉक्टर्स असून 91 डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये 44 तर जळगाव महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांची 10 पदे रिक्त आहेत.

डॉक्टरांच्या पदांव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 380 पदे रिक्त आहेत. शासकीय रुग्णांमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

तज्ञ डॉक्टरांचा अभाव
शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर नसल्याने योग्य आणि अचूक निदान होत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानसेवी तत्वावरील डॉक्टरांना (ऑन कॉल) बोलविण्यात येत असले तरी वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. योग्य उपचार होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांमध्ये रोष निर्माण होवून डॉक्टरांवरील हल्ला होण्याच्या घटना देखील घडू लागल्या आहेत.

जि.प. आरोग्य विभागात
380 पदे रिक्तजिल्हा परिषदेअंतर्गत 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 442 उपकेंद्र आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी 1, सहाय्यक आरोग्य अधिकारी 3, वैद्यकीय अधिकारी 44, प्रशासकीय अधिकारी 1, सांखिकी पर्यवेक्षक 12, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1, आरोग्य पर्यवेक्षक 5, औषध निर्माण अधिकारी 4, प्रयोग शाळा तंत्रज्ञ 1, आरोग्य सेवक 185, आरोग्य सेविका 104, सफाई कामगार 19 असे एकूण 380 पदे रिक्त आहेत.

मनपाचे रुग्णालय सेवाभावी संस्थांना देण्याचा निर्णय

जळगाव शहर महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात पुरेसी आरोग्य सुविधा आणि आरोग्य यंत्रणा नसल्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सक्षम आणि बळकटीकरण करण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर सेवाभावी संस्थांना देण्याबाबतचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रक्रिया सुरु आहे.

जिल्हा रुग्णालयात ‘सिटीस्कॅन’ बंद
जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पाच वर्षांपासून सिटीस्कॅन मशिन बंद आहेत. वर्षभरापूर्वी नवीन सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही ही मशिन कार्यान्वीत केली गेली नसल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात सिटीस्कॅन करावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड देखील रुग्णांना सोसावा लागत आहे.

 

प्रमुख पदांवर
प्रभारी ‘राज’
जिल्ह्यात आरोग्य विभागातील अनेक प्रमुख पद वर्षभरापासून रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी असे प्रमुख पद रिक्त असल्यामुळे या पदांवर सद्या प्रभारी ‘राज’ सुरु आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*