हमाल, टेम्पोचालक, मोलकरणी, बांधकाम व शेतमजुरांना पेन्शन

0

जळगाव । देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची सुरूवात येत्या 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. यात स्वत:चे नियमित योगदान दिल्यानंतर संबंधित कामगाराला त्याच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रूपयांची पेन्शन मिळणार आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रूपये किंवा त्या पेक्षा कमी आहे, अशा कुणासाठीही ही योजना आहे. त्यात हमाल, टेम्पोचालक, रिक्षाचालक वीटभट्टी कामगार, कचरा वेचणारे, मोलकरणीचे काम करणार्‍या महिला, भूमीहीन मजूर, बांधकाम मजूर किंवा शेतात काम करणारे मजूर आणि मजु री करणार्‍या इतर व्यक्ती यांना सहभागी होता येणार आहे.

संबंधित कामगाराच्या सध्याच्या वयानुसार त्याला या योजनेसाठी दरमहा काही रक्कम जमा करावी लागणार आहे. 18 व्या वर्षीच सुरुवात करणार्‍या व्यक्तीला सुरूवातीला दरमहा 55 रूपये या योजनेत भरावे लागणार आहे. 29 व्या वर्षी सुरुवात केल्यास 100 रुपये तर ज्यांचे वय चाळीस वर्षांचे आहे त्यांना दरमहा दोनशे रूपये भरावे लागणार आहेत. वयाच्या साठ वर्षांपर्यंत नियमितपणे ही गुंतवणूक सुरु ठेवल्यानंतरच संबंधित व्यक्तीला पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये लाभ घेणार्‍या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा जो कामगार आयकर भरत आहे, त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व बचत बँक खाते आवश्यक आहे. 18 वर्षांपेक्षा कमी व 40 वर्षांहून अधिक वयोगटातील कामगार किंवा मजूर किंवा छोट्या व्यावसायिकाला याचा लाभ घेता येणार नाही. ही योजना राबवण्यासाठी पेन्शन फंड ऍडमिनीस्ट्रेटर नेमला जाणार आहे. या योजनेत भाग घेणार्‍या व्यक्तीचा मध्येच मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांपैकी वारसाला उर्वरीत हप्ते भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. किंवा जर त्याला या योजनेत स्वारस्य नसेल तर मृत व्यक्तीच्या वारसाला त्या व्यक्तीने भरलेली रक्कम त्यावरील व्याजासह परत मिळणार आहे. पेन्शन सुरू झाल्यानंतर संबंधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला निम्म्या रकमेची पेन्शन मिळणार आहे.

15 फेब्रुवारीपासून सुरू होणार योजना
वीटभट्टी कामगार, कचरा वेचक,
भूमीहीन, रिक्षाचालकांनाही लाभ
असंघटीत कामगारांना वयाच्या 60
वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये
पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला
मिळणार निम्म्या रकमेचे पेन्शन

LEAVE A REPLY

*