राष्ट्रवादीत भुजबळ, मुंडे, जाधव कुठून आले?

0

जळगाव । भाजपावर टीका करणार्‍या आ.अजीत पवारांनी आपल्या पक्षाची उत्पत्ती कुठुन झाली हे बघावे. राष्ट्रवादीत भुजबळ, मुंडे आणि भास्कर जाधव हे कोणत्या पक्षातुन आले हे तपासुन पहावे. आ.अजीत पवारांना भाजपवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आज एका मेळाव्यात दिले.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा विजय संकल्प मेळावा आज पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. भाजपातील प्रवेश सोहळ्याची राष्ट्रवादीचे आ.अजीत पवार यांनी विधानसभेत खिल्ली उडवली होती. त्याला ना.गिरीश महाजन यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. आ.महाजन म्हणाले की, बंडखोरीतून राष्ट्रवादी काँग्रेसची उत्पत्ती झाली आहे. त्या पक्षात छगनराव भुजबळ, धनंजय मुंडे, भास्कर जाधव हे कुठुन आले? हे अजीत पवारांनी पहावे, तुमच्याकडुन तुमचेच सांभाळले जात नाही.

त्यामुळे तुम्हाला भाजपवर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. पायाखालची वाळू सरकत चालल्याने आ.पवार अशी विधाने करीत आहे असा टोलाही ना.महाजन यांनी लगावला. मी-मी म्हणणार्‍या अजीत पवारांच्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना भाजपने साफ केले. जळगाव शहरातदेखील गेल्या 15 वर्षात कुठलाही विकास झालेला नाही. जळगावच्या जनतेनेच आता भाजपला सत्ता देण्याचे ठरविले आहे. भाजपला एकहाती सत्ता दिल्यास या शहराचा चेहरा-मोहरा बदलावून वर्षभरात महापालिका कर्जमुक्त करुन दाखवू असेही ना.महाजन यांनी सांगितले.

इंटेलिजन्सचा 52 जागांचा रिपोर्ट – पालकमंत्री
महापालिका निवडणुकीत युती न केल्याने जनतेसमोर चांगला पर्याय आहे. या निवडणुकीत भाजपच्या 52 जागा निवडुन येतील असा इंटेलिजन्सचा रिपोर्ट असल्याची माहिती पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात दिली.

LEAVE A REPLY

*