सम्यक प्रबोधन मंचतर्फे धम्मक्रांती साहित्य परिषद

प्राध्यापक, डॉक्टर, वकिल यांचे योगदान समाजासमोर येत नसल्याची खंत

0
जळगाव । माता रमाई यांच्या 121व्या जयंतीनिमत्त सम्यक प्रबोधन मंचतर्फे रविवारी धम्मक्रांती साहित्य परिषद उत्साहात पार पडली. समाजाचा घेतला जाणारा वेध, समाजाला प्रोत्साहन व परिवर्तन या दोघांचा ठाव देणारे मार्ग म्हणजे साहित्य परिषद असल्याचा सूर साहित्यिक, कवी मान्यवरांकडून उमटला.

अल्पबचत भवन येथे ही परिषद पार पडली. सद्धम्म पत्रिका मुंबईचे संपादक आनंद देवडेकर यांनी परिषदेचे उद्घाटन केले. अ‍ॅड.राजेश झाल्टे, अरविंद सुरवाडें, किरण सोनवणे, राजेश सरकटे, ज्येष्ठ कवी धर्मराज निमसरकर, प्रा.नाना पटाईत, सुरेश साबळे, भगवान भटकर, सुभाष सपकाळे, व्ही.डी. बिर्‍हाडे, मुकुंद नन्न्वरे, वसंत सपकाळे आदी मान्यवर व्यावसपीठावर उपस्थित होते.

डॉ.बाबसाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती फलश्रृती आणि आव्हाने हा परिसंवाद रंगला. आनंद देवडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेबांची चळवळ ही देशातील खरी स्वातंत्र्याची चळवळ असल्याचे नमूद करत, सर्वांगीण पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा लढा, रक्ताचा एक थेंबही न सांडता होणारी क्रांती म्हणजे ‘धम्मक्रांती’ असल्याचे त्यांनी सांगितले. धम्मक्रांतीच्या दिशेने साहित्य परिषदांचा वेध घेवून समाजोपयोगी साहित्याचा उहापोह करण्याची आज नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजातील प्राध्यापक, डॉक्टर, वकिल हे धम्मक्रांतीतूनच घडले खरे पण त्यांचे योगदान साहित्यातून समाजासमोर येत नसल्याची खंतही देवडेकर यांनी व्यक्त केली. पाली भाषेचा प्रचार, प्रसार व ती विद्यापीठांपर्यत पाहेचविण्याचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या माध्यमातून घडला. संस्कृत भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. बहिणाईंनी जात्याच्या माध्यमातून जन्मापासून ते मृत्यूप्रर्यंतचा प्रवास समाजासमोर मांडला. खान्देशची भूमी ही या विभुतींमुळे परितर्वनवादी ठरली असल्याचे देवडेकर यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे प्रकाशन करण्यात आले. पी.आर.सोनवणे यांनी स्वागत गीत गायले. तर रागिनी बोदडे यांनी माता रमाईंच्या जीवनावर गीत गाऊन रमाईंचा इतिहास उपस्थितांसमोर उभा केला. प्रा.यशवंत मोरे यांनी प्रास्ताविक केले. तर कवी वसंत सपकाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*