मानसिक विकाराचे निदर्शक

0
दिल्लीतील सामूहिक आत्महत्येची घटना असो वा किरकोळ कारणांवरून राजरोस होणार्‍या हत्या असोत, ही गंभीर मानसिक विकारांची लक्षणे आहेत. तरीही समाजात अजून मानसशास्त्रज्ञ ही बाबच विचारात घेतली जात नाही. किंबहुना, मानसोपचारतज्ञांना खर्‍या अर्थाने स्वीकारलेले नाही. याचा गैरफायदा भोंदू बाबा-बुवा उचलत आहेत.

आजकाल विविध कारणांमुळे ताण-तणाव वाढले आहेत. त्यावर उपाय म्हणून साधू वा महाराजांकडे धाव घेतली जाते. अध्यात्माचा आधार घेतला जातो. परंतु भय्यू महाराजांच्या आत्महत्येच्या घटनेने अशा साधू-महाराजांवरील वाढत्या ताणाचा मुद्दा समोर आला. खरे तर मेंदूतील हार्मोन्सना बाहेरचे अध्यात्म कळत नाही. ही केवळ वरवरची मलमपट्टी असते. त्यामुळे अध्यात्माद्वारे मानसिक विकारावर मात करता येईल असे नाही.

त्यासाठी शास्त्रीय पद्धतीच्या उपचारांचीच गरज असते. अध्यात्मात तुम्हाला कोणत्या तरी काल्पनिक विश्वात नेले जाते. परंतु वास्तव त्यापेक्षा भयानक असते. त्यामुळे तणावावर वेळीच मानसोपचारतज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचार घेतले पाहिजेत. मध्यंतरी प्रसिद्ध व्यक्तीने ‘आम्ही डिप्रेशनची शिकार झालो होतो’ असे कबूल केले होते. अशा पद्धतीने डिप्रेशनच्या आहारी गेलेल्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.दिल्लीतील घटनेत ललित हा स्वप्नात वडिलांशी बोलायचा. त्या बोलण्यातील गोष्टी लिहून काढायचा, असे सांगितले जाते.

याचाच अर्थ तो सायकोसिक डिसऑर्डर या आजाराने पछाडला होता. परंतु हे कुटुंबातील इतर व्यक्तींना कळले नाही. याचा अर्थ ते विवेकनिष्ठ, शास्त्रशुद्ध विचारसरणी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी ललितवर वेळीच मानसोपचारतज्ञांकडून उपचार करण्याऐवजी आंधळा विश्वास ठेवून साथ दिली. एका मानसशास्त्रज्ञाच्या मतानुसार ‘ड्रीम इज अ रॉयल रोड फॉर अनकॉन्शस माईंड’ म्हणजेच स्वप्न हा अबोध मनाचा मोठा मार्ग आहे. अबोध मन हे स्वप्नाच्या मार्गाने मार्गस्थ होते. त्यामुळे मनात घडते ते स्वप्नातून व्यक्त होते.

आपण संगणकात फाईल टाकतो. त्यानंतर कधी वरची फाईल खाली गेल्याची आणि खालच्या फाईल वर आल्याचे पाहायला मिळते. त्याच पद्धतीने मनातही अनेक घटना साचलेल्या असतात. त्यात लहानपणीचा काही भाग असतो. काही तरुण वयातील घटना, घडामोडी असतात. ही सगळी मनावरची ओझी आपण वाहतो. त्यातून निर्माण होणारा ताण वेळीच दूर व्हायला हवा.
– डॉ. कृष्णा मस्तूद, मानसोपचारतज्ञ

LEAVE A REPLY

*