Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 826 रुग्ण करोनामुक्त

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 826 रुग्ण करोनामुक्त

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात आज दि.19 जुलै रोजी एकाचदिवशी 174 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62 टक्क्यांपर्यंत वाढले असून हे प्रमाण देशाच्या व राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 826 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान जिल्ह्यात आज कोरोनाच्या 304 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या जिल्ह्यात 2 हजार 579 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर तपासणीबरोबरच रॅपिड ॲन्टीजन तपासणी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 38 हजार 882 कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 29 हजार 715 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 7 हजार 796 अहवाल आले पॉझिटिव्ह आले आहे. शिवाय इतर अहवालाची संख्या 491 असून अद्याप 880 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या 38 हजार 832 व्यक्तींपैंकी 7 हजार 796 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा 20 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 2 हजार 579 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 1751, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 262, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 566 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 809, जळगाव ग्रामीण 188, भुसावळ 212, अमळनेर 91, चोपडा 155, पाचोरा 76, भडगाव 30, धरणगाव 115, यावल 32, एरंडोल 145, जामनेर 259, रावेर 145, पारोळा 64, चाळीसगाव 101, मुक्ताईनगर 94, बोदवड 50, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 13 रुग्णांचा समावेश आहे.

391 बाधित रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 391 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी 75 टक्केपेक्षा अधिक रुग्ण हे 50 वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचे निदान झाले आहे. मागील महिन्यापर्यंत 12 टक्क्यांवर असलेला जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना तसेच लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या सहकार्याने 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रशासनास यश आले आहे. हा दर अजून कमी होण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

नागरिकांनी जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या