मातंग समाजाच्या तीन मुलांना विवस्त्र करुन मारहाण

विहिरीत पोहण्याचे कारण : वाकडी येथील घटना; दोघांना अटक

0
जळगाव । पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडल्याचे आज उघळ झाले. मातंग समाजाची तीन मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांची नग्न धिंड काढून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली.

10 जून रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी आज पहूर औटपोस्टला शेतमालक आणि त्याच्या नोकरा विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पिडीत मुलांपैकी एकाच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचीच चूक होती. त्यांना वारंवार विहिरीत पोहण्यास न जाण्याचा सुचना दिल्या होत्या. 80 फुट विहिरीत पोहणे जिवावर बेतले असते म्हणूनच त्यांना शेतमालकाने त्यांना शिक्षा केली.

यात काहीही गैर नाही. असे म्हटले आहे. दरम्यान, दुसर्‍या एका पिडित मुलगा आणि त्याच्या आईच्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र, ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील वाकडी शिवारात भटक्या जोशी समाजाचे ईश्वर जोशी यांच्या शेतात विहिर आहे. या विहिरीत 10 जून रोजी मातंग समाजाचे तीन तरूण पोहायला उतरले होते. या क्षुल्लक कारणावरून शेतमालक ईश्वर जोशी व त्याच्या सालदार प्रल्हाद कैलास लोहार उर्फ सोन्या यांनी या तिघा मुलांंची गावातून नग्न धिंड काढण्यात नंतर शेतातील एका घरात तिघांना अमानुष मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडिओ तयार केला होता. काल पासून सोशल मिडियात हा व्हायरल झाला अणि खळबळ निर्माण झाली. गावात राहायचे आहे, या भीती पोटी पीडितांच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणी तक्रार देण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. अखेर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई सुरू केली. हा व्हिडिओ कुठला?, कुणी काढला? याबाबत सर्वच अनभिज्ञ होते. पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला.

याबाबत पिडित मुलाची आई दुर्गाबाई सांडू चांदणे यांनी आज (दि.13) पहूर पोलिसात तक्रार दिल्यावरून शेतमालक ईश्वर जोशी आणि सालदार प्रल्हाद लोहार यांच्याविरूध्द भाग-5 , गु.र.नं.46/2018 भा.दं.वि.324, 504, 506, 34 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अ व अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1),(इ),(ई),(आर),(एस) तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम संरक्षण कायदा कलम 11(आर) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, तीन मुले पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत वारंवार पोहायला जात होते. त्यांना वारंवार सांगून देखील हा प्रकार सुरू होता, यामुळे त्यांना मारहाण केली.

पोहतांना त्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्यांना तशाच अवस्थेत मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचे नग्न फोटो व्हायरल करण्यात आल्याने एका मुलाच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे. पुरोगामी महाराष्ट्र अजूनही जाती-भेदाच्या जोखडातून मुक्तच झालेला नाही असे या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.

या गुन्ह्याचा तपास पाचोर्‍याचे उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पो.स्टे.चे सहा.पो.नि.मोहन बोरसे, पो.उ.नि.शिवाजी नागवे, हे.कॉ. रघुनाथ पवार, पो.कॉ.नाईक, संतोष चौधरी, पो.कॉ.मुकूंद परदेशी, रामदास कुंभार, पंढरीनाथ पोटे हे करीत आहेत.

जातीय रंग नको, ही विकृतीच!
मुलांना मारहाण करण्याची घटना म्हणजे मानसीक विकृती आहे त्याला जातीय रंग देवू नका. घटनेतील दोषींवर सरकार कठोर कारवाई करेल. मी स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासंपर्कात आहे. समाजाची मनोदशा बिघडत आहे. घटनेतील सर्व दोषींवर कारवाई करण्यात येईल.
– ना.चंदक्रांत पाटील, पालकमंत्री

कडक कारवाईचे आदेश!
वाकडी येथील तरुणांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याची क्लीप मी बघीतली ही घटना अतिशय गंभीर असून दुर्दैवी आहे. या संपूर्ण प्रकाराची शासनस्तरावरुन चौकशी करुन जे कोणी यामधे दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. आरोपींना कडक शासन होईल . पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करीत आहेत.
– ना.गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

उन्नाव पार्ट – 2
जळगाव जिल्ह्यातील घटना म्हणजे उत्तरप्रदेशातील उन्नाव घटनेचा पार्ट -2 आहे. दलितांना मिळणारी अशी वागणूक चिंतेचा विषय असून आजही जातीय व्यवस्थेचा समाजावर किती पगडा असल्याचे सिध्द होते. अशा प्रकारच्या अन्यायामुळेच दलित धर्मांतर करू लागले आहेत. वाकडीची घटना म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे.
– आ.जिग्नेश मेवाणी, दलित नेता

LEAVE A REPLY

*