खडसेंनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव जाहीर करावे!

0
जळगाव । भारतीय जनता पार्टी विरोधात राज्यातील जनतेमध्ये तिव्र नाराजी आहे. या सरकारने जनतेला तर फसवलेच आहे. परंतु त्यांचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांना देखील त्यांच्याच सरकारमधील मंत्र्याने षडयंत्र रचून अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे खुद्द खडसेंनी काल सांगितले होते. खडसेंना तो मंत्री माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव जाहीर करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतिष पाटील यांनी आज येथे केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातील सरदार पटेल सभागृहात युवकांचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतिष पाटील, माजी आ.अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक,

जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड.रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, किसान सेलचे सोपान पाटील, संदीप पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, माजी महानगराध्यक्ष परेश कोल्हे, रमेश पाटील, योगेश देसले, राजेश पाटील, सावदाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सविता बोरसे, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते. आ.डॉ.सतिष पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारला जनता आता त्रस्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन काम करण्याची गरज आहे. या भाजपाने त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला देखील सोडले नाही. मंत्र्याच्या आडून देखील त्यांना त्रास देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल यांनी मेळाव्याच्या प्रास्ताविकातुन युवकांच्या संघटनाबाबत आढावा सादर केला. तसेच प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार जिल्हाभरात ‘वन बुथ 15 युथ’ ही संकल्पना यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महापौर निवडीत आम्ही निर्णायक – गुजराथी
युवाशक्ती ही अणुशक्तीपेक्षाही मोठी आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये युवकांची भुमिका ही महत्वाची आहे. जळगाव शहरात आगामी काळात होवू घातलेली महापालिकेची निवडणुक देखील युवकांच्या ताकदीवर लढविली जाईल. त्यामुळे महापौर निवडीत आम्ही निर्णायक असून आमच्या मदतीशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही, असे मत माजी आ.अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले.

वन बुथ 15 युथ संकल्पना राबविणार! – संग्राम कोतेपाटील
ज्या पक्षामध्ये युवकांची संख्या अधिक आहे, त्याच पक्षाचे भवितव्य उज्वल असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवकांचे आघाडी अधिक मजबुत करण्यासाठी ‘वन बुथ 15 युथ’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला सत्तेचा माज आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात दररोज खुनाच्या घटना घडत आहे. आणि हे सरकार फेक योजनांची घोषणा करण्यात मग्न आहे. सरकारच्या या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी युवकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन संग्राम कोतेपाटील यांनी केले.

लेटरपॅड पुरते मर्यादीत राहु नका! – देवकर
युवकांनी केवळ लेटरपॅड पुरते मर्यादीत न राहता, ग्रामीण भागात जावून काम केले पाहिजे. त्यासाठी युवकांचे संघटन वाढविण्यावर भर द्यावे, असे आवाहन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.

LEAVE A REPLY

*