केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्याकडून अहवाल मागविणार!

0
नवी दिल्ली । खान्देशातील केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडुन 4हवाल मागवुन त्यांना मदत मिळवुन देण्याचे आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आज आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.

माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यावेळी खा. रक्षा खडसे, आ. हरीभाऊ जावळे, जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, सुरेश धनके, सुनील पाटील, पंस सदस्य विकास पाटील,

गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, महेश पाटील, रमेश पाटील, किशोर महाजन, काशीनाथ धनगर, रामदास पाटील उपस्थित होते. निपाह रोगाचे विषाणू केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत आणि गेल्या 10 ते 12 दिवसापासून तेथील बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, मालवाहतुकदार घाबरले आहेत.

जळगाव आणि बुलढाणा परिसरातील केळीवर कोणत्याही प्रकारची लागण नसून, उत्तर भारतातील पडून असलेल्या केळीमधील नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवावेत. खान्देशातील केळी वर निपाह रोगाचे विषाणू असल्याची अफवा पसरवणार्‍यावर कडक कारवाई करावी आणि खान्देशातील 1500 ते 1600 हेक्टर जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान झाले पाहता सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे केली.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी केळीचे नमुने व्हायरॉलॉजी विभागाकडे पाठवून त्याची दोन दिवसात तपासणी करावी आणि सरकारकडून खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू नसल्याचा संदेश प्रसारित करण्यात यावा अशा सूचना दिल्या. केळी उत्पादकांचे झालेले नुकसान पाहता,

ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण घेतले आहे, राज्य सरकार आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी बैठक घेतली जाणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा संरक्षण घेतलेले नाही अशा शेतकर्‍यांसाठी काय उपाय योजना करता येतील याचा राज्य सरकारकडून अहवाल मागवण्याचे आश्वासनही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले.

LEAVE A REPLY

*