बहिरेपणा: उपचारासाठी पुढे या

0
अनुभवाने असे आढळते की बहिरी व्यक्ती सुरुवातीच्या बहिरेपणाच्या काळात उपचारासाठी विशेष उत्सुक नसते. ज्या कारणांमुळे बहिरेपणा येतो त्यातील बहुतेक रोगांमध्ये कान दुखत नाही.

सुरुवातीच्या काळातील बहिरेपणाचे महत्त्व विशेष वाटत नाही. नंतर जेव्हा समाजात व व्यवहारात अडचण येते त्यावेळी बहिरी व्यक्ती उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाते. साधारणत: असे आढळते की बहिरेपणाचा दोष हा 35 ते 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक वाढल्यानंतरच रोगी स्वत: डॉक्टरांकडे जातो. सुशिक्षितांमध्येही असेच आढळते. चाळीस टक्क्यांपर्यंत हळूहळू वाढलेला बहिरेपणा बर्‍याचशा व्यक्तींना स्वत:ला जाणवत नाही.

आंधळ्या व्यक्तीबद्दल सर्वांनाच करूणा वाटते. पण बहिर्‍या व्यक्तीशी उपहासाने व थट्टेने बहुतेक लोक वागतात.

एकदा एक उच्चस्तरीय तरुण अधिकारी आपण खरोखरच बहिरे आहोत काय? ही शंका निरसन करण्यासाठी माझ्याकडे आले. त्यांच्या ऑडिओग्राममध्ये असे आढळले की, त्यांना 35 ते 40 टक्क्यांचे दरम्यान हा दोष होता. त्यांना त्याची माहिती खोलवर विचारल्यावर ते म्हणाले की त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांना बालपणी किंवा तारुण्यात कधीही कानाचा त्रास झालेला नाही. ते पुढे म्हणाले की आज मी आतल्या खोलीत नाश्ता करीत असताना बाहेरच्या खोलीत फोनची घंटी वाजली. मित्राचा एवढ्यात फोन येणार एवढी कल्पना असूनही फोनच्या घंटीचा आवाज मला जाणवला नाही. घरातील इतर मंडळींना मात्र तो ऐकू आला. परंतु, मला तो आवाज ऐकू आलाच नाही.

म्हणून मला कसेसेच वाटले. पुढे पुन्हा असे होऊ नये, ऑफीसमध्ये माझी फजिती होऊ नये, म्हणून काळजीने लगेच मी तुमच्याकडे आलो. वास्तविक त्या गृहस्थाचे माझ्याकडे येणे हेच मुळी उशीरा होते. कारण त्यांना कानातील शिरेचा दोष होता व या दोषामध्ये व्यक्तीला हळू आवाजात जवळून बोललेले ऐकू येते, परंतु दूर अंतरावरून मोठ्याने बोललेले ऐकू येत नाही, अशी बहिरी व्यक्ती समोरची व्यक्ती हळू आवाजात बोलली असेल म्हणून आपणास आवाज ऐकू आला नाही अशी स्वत:ची समजूत करून घेते. काही वेळा अशा बहिर्‍या व्यक्ती बोलणार्‍या व्यक्तीच्या हावभावावरून व ओठांच्या हालचालींवर लक्ष देऊन समोरची व्यक्ती काय बोलली असेल हे परस्पर समजतात. याला ओठांची भाषा (लीप लॅग्वेज अथवा लीप रिडिंग) म्हणतात. सवयीने ही भाषा समजावयास फारच सोपी जाते. त्यामुळे बहिरेपणाच्या दोषाचे उपचार ती व्यक्ती योग्य वेळी व योग्यरितीने करवून घेत नाही.

एकदा एक एस.टी. महामंडळात काम करणारा कंडक्टर त्याच्या मुलाच्या गळ्याचा दोष दाखविण्यासाठी माझ्याकडे आला. त्या मुलाच्या गळ्याची शस्त्रक्रिया झाली व मुलाची रुग्णालयातून सुटी करताना त्या कंडक्टरच्या सोबत असलेल्या मित्राने कंडक्टरला कान तपासून घेण्याचा आग्रह केला. म्हणून कंडक्टरने नाखुषीनेच कान तपासून घेतले. त्यावेळी असे लक्षात आले की, त्याला ऑटोस्क्लेरोसीस रोग झालेला असून दोन्ही कानांमध्ये 50टक्के बहिरेपणाचा दोष निर्माण झालेला आहे. त्याला अधिक माहिती विचारल्यावर म्हणाला की,

त्याला बर्‍याच वर्षांपासून कधी कधी बहिरेपणा जाणवत होता. परंतु, नेहमीच्या कामांमध्ये विशेष अडचण जात नव्हती. मात्र 1-2 वर्षांपासून जास्त त्रास होतो आहे. ‘ऑक्टोस्क्लेरोसीस’ या रोगात गोंधळाच्या व गर्दीच्या ठिकाणी रोग्याला चांगले ऐकू येते. कारण अशा स्थळांवर लोक आवाज मोठा करून बोलत असतात. म्हणून कंडक्टरला प्रवाशांशी व्यवहार करताना बहिरेपणा असूनही ऐकण्याची अडचण कधी विशेष आली नाही. तसेच या रोगामध्ये कधीही कान दुखत नाही. त्यामुळे रोग वाढला आहे हे समजण्यासाठी मार्ग नसतो.

डॉ. प्रमोद महाजन 

LEAVE A REPLY

*