डोळे येणे

0
अनपेक्षितपणे जेव्हा अनेक व्यक्ती गॉगल्स घालून फिरायला लागतात तेव्हा ती फॅशन नसून डोळे येण्याची साथ आल्याची शंका येते. ज्याप्रमाणे तोंड येणे म्हणजे तोंडाच्या अस्तर असलेल्या अंत:त्वचेचा दाह होतो त्याप्रमाणे डोळे येण्यात डोळ्यातील जे लायनिंग (अस्तर) असते त्याला सूज येऊन तेथे दाह निर्माण होतो. हा आजार जास्त करून साथीच्या स्वरुपात येतो.

जिवाणू (बॅक्टेरिया) व विषाणू (व्हायरस) यांच्यामुळे डोळे येतात. त्याचप्रमाणे धूळ, धूर, वादळी वारे, रासायनिक पदार्थ व त्यांची वाफ, अ‍ॅलर्जी एवढेच काय वेल्डिंग करताना त्या स्पार्ककडे जास्त वेळ पाहिल्याने त्यातील अतिनील किरणांमुळेच डोळे येऊ शकतात. सर्दी, गोवर यासारख्या श्वासमार्गाच्या विकारातही डोळे चुरचुरणे व लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

डोळे लाल होणे, चुरचुरणे, त्यातून पाणी येणे, रात्री झोप झाल्यानंतर सकाळच्या वेळी डोळ्यांशी पांढरट घाण साठून डोळे चिकटणे, अशी लक्षणे या रोगात असतात. या रोगाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यात दिसण्याच्या क्रियेत काहीही अडथळा नसतो. वरील लक्षणांबरोबरच जर दृष्टिदोष असेल, तर मात्र डोळे येण्यापेक्षा अधिक गंभीर आजाराची शक्यता असते.

‘साथी हाथ बढाना’ने साथ वाढते
विषाणू व जिवाणूंमुळे येणारे डोळे हे सर्दीसारखेच स्वत: होऊन बरे होणारे असतात. फक्त याने साथीचे रुप धारण करू नये, यासाठी काही स्वच्छतेचे नियम पाळावेत. हातरुमाल, कपडे, टॉवेल, बोटाने डोळे चोळणे याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. केवळ डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यानेही डोळे येतात, हा मात्र गैरसमजच आहे. डोळे लाल झालेल्या व्यक्तीकडे पाहिल्यास सहानुभूतीपोटी आपल्यालाही डोळे चुरचुरल्यासारके, पाणी आल्यासारखे वाटते एवढे मात्र खरे!

गरम शेक देतो थंडावा
कोमट पाण्याने डोळे दर 2-4 तासांनी धुतल्याने डोळ्यातील चिकट पदार्थ वाहून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर ‘गरम शेक’ मिळाल्याने डोळ्यास ‘थंडावा’ मिळतो. (येथे थंडावा हा शब्द आराम या अर्थी आहे.)

गांधारी होऊ नका
डोळे बंद करून त्यावर पट्टी वगैरे बांधू नये. त्याने अधिक त्रास होतो. मात्र काळा चश्मा वापरल्याने बरे वाटते. एक डोळा आल्यास त्या डोळ्याचा रुमाल हात दुसर्‍या चांगल्या डोळ्यास लावू नये. कुशीवर झोपताना आलेला डोळा खालच्या बाजूला, गादीजवळ राहील, असे झोपल्यास त्यातील स्त्राव वाहून चांगल्या डोळ्यास संसर्ग व्हायची शक्यता कमी होते. अर्थात एवढे करूनही दुसरा डोळा येण्याची शक्यता खूप असते.

आले डोळे त्यामुळे ‘गेले’ डोळे
साथीच्या काळात घरात एखाद्याला डॉक्टरांनी दिलेले थेंब वा मलम सहसा सगळ्यांना उपयोगी पडू शकते. त्याचा वापर दिवसात 5-6 वेळा करावा. मात्र डोळे आल्याशिवाय घरातील इतरांनी त्या थेंबांचा वापर प्रतिबंध उपाय म्हणून करू नये. या औषधात स्टिरॉइड्स नाहीत, याची खात्री करावी. कारण विषाणूंमुळे होणार्‍या रोगात तसे थेंब रोग अधिक गंभीर करू शकतात.

डोळे येणे 3-4 दिवसांत बरे होते. पण तसे न होता दृष्टिदोष वाटल्यास, प्रकाश सहन होत नाही असे वाटल्यास त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा.

शेवटी थोडी गंमत. ‘डॉक्टर, हा चश्मा बनवून लावल्यानंतर मला वाचता येईल ना?’

“म्हणजे काय? नक्कीच!”

“काय आश्चर्य आहे हो, मी मुळात शिकलेलोच नाही.”

डॉ. विकास गोगटे 

LEAVE A REPLY

*