वर्ल्डकप भवितव्य ठरविणार : मेस्सी

0
मास्को । रशियात होणार्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाचा संघ कशी कामगिरी करतो, यावर माझे भवितव्य अवलंबून आहे, असे मत कर्णधार लिओनेल मेस्सी याने व्यक्त केले आहे. थोडक्यात, ही स्पर्धा मेस्सीच्या आयुष्याला कलाटणी देणारी असणार आहे.

मेस्सी सध्या 31 वर्षांचा असून त्याची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा आहे. जगातील सर्वात चांगला फॉरवर्डर म्हणून ओळखला जाणार्या मेस्सीला आपल्या देशाला वर्ल्डकप जिंकून देता आलेला नाही. कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर त्याने अर्जेंटिनाकडून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती;

परंतु देशातील चाहत्यांचा आणि नामी व्यक्तींच्या दबावामुळे त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. आता आपल्या बहुधा शेवटच्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवून देण्याचा दबाव त्याच्या खांद्यांवर आहे.

एका स्पॅनिश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मेस्सी म्हणाला की, ही स्पर्धा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी असेल. या स्पर्धेत आम्ही कोठेपर्यंत धडक मारतो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. अर्जेंटिना संघ तीन मोठ्या फायनल सलगपणे हरला आहे. यामध्ये वर्ल्डकप (2014), कोपा अमेरिका स्पर्धा (2015, 2016) यांचा समावेश आहे.

2014 च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला जादा वेळेत झालेल्या गोलमुळे जर्मनीकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर कोपा अमेरिकामध्ये चिलीने त्यांना हरवले होते.

या स्पर्धेत संभाव्य विजेता कोण, असे विचारले असता मेस्सी म्हणाला, आमच्या संघासह स्पेन, ब्राझील, जर्मनी, फ्रान्स आणि बेल्जियम हे संघ विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत आघाडीवर असतील. प्रत्येक संघ येथे मोठ्या आत्मविश्वासाने आला आहे. प्रत्येकाचे कसब वेगळे आहे, असेही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

*