जळगाव । तंत्रशिक्षण संचालनालयाने विविध पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांकडून साईट लोकेशनमध्ये बदल करणे, संस्था कायमस्वरूपी बंद करणे, पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यानुसार जळगावसह राज्यातील तब्बल तेवीस तंत्रनिकेतन संस्थांनी संस्था बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे या संस्था सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पदविका अभ्यासक्रम राबविणार्‍या ज्या संस्थांनी साईट लोकेशनमध्ये बदल करणे, संस्था कायमस्वरूपी बंद करणे, पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. अशा सर्व संस्थांची तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयीन स्तरावर तपासणी करण्यात आलेली आहे. परंतु या संस्थांनी पाठविलेल्या प्रस्तांवामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ज्या त्रुटी आहेत. त्या संदर्भातील कागदपत्रे येत्या 22 मार्चपर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरच संबंधित महाविद्यालयांना शासनामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शासनास शिफारस करण्यात येणार आहे. बंद होणार्‍या तंत्रनिकेतनमध्ये जळगाव जिल्ह्यातील संस्थांचाही सहभाग आहे. मुंबई, जयसिंगपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, जळगाव, नाशिक, वर्धा, परभणी, लातूर, यवतमाळ आदी शहरांतील तंत्रनिकेतनचाही बंद होणार्‍या संस्थांमध्ये समावेश आहे.

तब्बल 18 औषधनिर्माणशास्त्र संस्थांत पदविका अभ्यासक्रम सुरू
राज्यात गेल्या काही वर्षांत फार्मसीची मागणी वाढली असून, फार्मसी अभ्यासक्रमांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. त्यामुळे 2019- 20 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील 18 पदवी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा प्रस्तावच संबंधित संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयास पाठविला आहे. यामध्ये पुण्यातील तब्बल सहा संस्था आहेत, तर उर्वरित 12 संस्था या अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, जळगाव, वर्धा, नागपूर, धुळे या शहरांतील आहेत.

LEAVE A REPLY

*