‘बिच्चारे’ सहकारमंत्री…!

0

राज्यातील भाजप सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र कुठे पोहोचला? (वा कुठे नेऊ ठेवला?) हा संशोधनाचा व वृत्तवाहिन्यांवरील भाकड चर्चांचा विषय का ठरला? आतापर्यंत अनेक मंत्र्यांच्या ‘कर्तबगारी’च्या अनेक रंजक कथा माध्यमे चघळत आहेत,

पण कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारी स्थितप्रज्ञता प्रत्येकवेळी राज्यातील ‘पारदर्शी’ कारभाराची हमी देण्यास पुरेशी ठरली. मुख्यमंत्र्यांचे विशाल मन दरवेळी द्रवत राहिले व सर्व सहकार्‍यांना ‘स्वच्छतेची प्रमाणपत्रे’ (क्लीन चिट) सहज मिळत राहिली. कधी ते चिकट चिक्कीबाबत असेल, कधी कुणाच्या भूखंडात श्रीखंड ओतले गेले असेल तर कधी कुणाच्या पदवीचा प्रश्न उपस्थित झाला असेल.

कसल्या न् कसल्या घोटाळ्याचा पाढा विरोधकांनी वाचावा, सत्तेतील सहकारी मित्रपक्षाने त्याची री ओढावी, इतका मजेदार खेळ बिनबोभाट चालूच राहिला. ‘आरोपी’ मंत्र्यांना सहजपणे ‘स्वच्छतेच्या प्रमाणपत्राची’ आंघोळ घालून शुचिर्भूत करून घेतले गेले.

तरी कुठल्या न् कुठल्या मंत्र्याला अडचणीत आणण्याचा नसता उपद्व्याप केल्याशिवाय विरोधकांना चैनच पडत नसावे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आता विरोधकांच्या या खेळाचे बळी (टार्गेट) ठरले आहेत. सोलापूर मनपाच्या मालकीच्या आरक्षित जागेवर ‘टोलेजंग’ बंगला बांधल्याचे प्रकरण कुणीतरी उकरले. फार गाजू लागले म्हणून गांजलेल्या तेथील मनपा आयुक्तांना चौकशी करावीच लागली.

चौकशीअंती सहकारमंत्र्यांचा बंगला ‘बेकायदेशीर’ ठरवण्याची हिम्मत आयुक्तांनी कुणाच्या सांगण्यावरून दाखवली असावी? काय झाले असेल ते त्यांनाच माहीत, पण बंगला ‘बेकायदेशीर’ असल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून आयुक्त रजेवर गेले. सहकारमंत्री ‘कर्तबगार मंत्री’ म्हणून ओळखले जातात. राज्यातील हजारो सहकारी संस्था त्यांनी लीलया अवसायानात काढल्या. ते कायद्याचे ‘गाढे’ अभ्यासक मानले जातात. तरीही पालिकेच्या जागेवर ‘बेकायदेशीर’ बंगला त्यांनी बांधला हे कसे खरे मानावे?

मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकार्‍यांना ‘स्वच्छता प्रमाणपत्रे’ मिळाली तसे त्यांनाही मिळणार नाही का? आपल्या ‘स्वच्छ’ कारभाराची खात्री असल्यामुळेच ‘दोषी आढळल्यास व मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास तत्काळ मंत्रिपद सोडू’ असे देशमुखांनी निडरपणे म्हटले असावे. अनेक मंत्र्यांच्या ‘स्वच्छ’ असण्याबद्दलचे प्रमाणपत्र देणारे मुख्यमंत्री देशमुखांचा अपवाद करू शकतील का? काही ना काही खुसपटे काढून उच्चपदस्थांच्या ‘स्वच्छतेवर’ शिंतोडा उडवण्याचा खुळा नाद लागलेल्यांनी बिचार्‍या देशमुखांवर नाहक आरोप तरी का करावा? त्या दृष्टपणामुळे राज्याच्या पारदर्शी कारभाराची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जातात, हेसुद्धा कुणी लक्षात घेऊ नये? अरेरे! कुठे निघालाय महाराष्ट्र?

LEAVE A REPLY

*