असे का घडते?

0

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बारामतीत नुकतीच घडली. अमेरिकेतील सुप्रसिद्ध म्युझिक बॅण्ड ‘लिंकिंग पार्क’चा मुख्य गायक चेस्टर बेनिंग्टनने राहत्या घरी अमेरिकेत आत्महत्या केली.

राज्याच्या प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ सनदी अधिकारी दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मन्मथ म्हैसकरने स्वत:ची जीवनयात्रा संपवली हीसुद्धा ताजी घटना! अस्वस्थ करणार्‍या अनेक प्रश्नांना तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांनी जन्म दिला आहे.

तरुण आयुष्यात असे नेमके काय घडत असेल की ज्यामुळे जीवन संपवण्याइतके टोकाचे पाऊल तरुण उचलत असावेत? आपले आयुष्य फक्त मुलांच्या भल्यासाठीच आहे, असे मुलांना सतत ऐकवणार्‍या पालकांचाही आधार त्यांना का वाटत नसावा? मित्रांशीही संवाद साधण्याची गरज उरली नसेल का? की या सार्‍या नातेसंबंधांतील बटबटीत पोकळपणा त्यांना जाणवला असावा? आपल्या मुलांनी एक उत्कृष्ट माणूस असावे, अशी सर्वच पालकांची इच्छा असते.

मुलांना मूल्यशिक्षण मिळावे यासाठी उत्तम शाळा निवडीपासून सर्वतोपरी काळजी घेतली जाते; पण जवळच्याच ‘कथनी व करनी’मधील फरक या मुलांना उद्ध्वस्त करणारा ठरत असावा का? पालक सांगतात एक व वागतात दुसरेच असेही अनुभव काहींना येत असावेत का? अनेक शासकीय अधिकारी आणि उच्चपदस्थ भ्रष्टाचाराच्या गर्तेत बरबटतात.

समाजात त्यांची बदनामी ऐकून मुलांच्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम होत असेल का? देशात सर्वत्र माजलेला भ्रष्टाचारसुद्धा तरुणांमध्ये निराशा वाढवणारा व आत्महत्येचे कारण ठरणे अशक्य नाही.

आपली मुले अस्वस्थ आहेत हे नोकरदार दाम्पत्यांच्या कसे लक्षात येणार? चंगळवादी भौतिक गरजांच्या मागे धावताना तेवढाही वेळ पालकांकडे उरलेला नाही का? अर्थात काही पालक या गर्तेला अपवाद असतीलच.

मुलाच्या वागण्यात बदल झाल्याचे मुंबईतील एका व्यावसायिक पालकांच्या लक्षात आले. त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांनी मुलाशी संवाद वाढवला. मुलगा अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे त्यांना आढळले.

त्याबद्दल मुलाला दोष न देता पालकांनी हा प्रसंग कौशल्याने हाताळला. मुलावर पाळत ठेऊन अमली पदार्थ पुरवणार्‍याला पोलिसांच्या मदतीने पकडून दिले. आता या पालकांनी आपल्या मुलाला व्यसनातून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांनी नुसते अस्वस्थ होणे वा कारणांची चर्चा करणे आत्महत्या थांबवू शकणार नाही. घडलेल्या घटनांमागची नेमकी कारणमिमांसा शोधून त्यावर उपाय करण्याची जबाबदारी संबंधित सर्वच घटकांची आहे. प्रत्येक घटकाने आत्मचिंतन करून स्वत:ला तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.

 

 

LEAVE A REPLY

*